अशाही वस्तूंवर लावले जातात कर

ballon
या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची लगबग राजधानी दिल्लीत सुरू झालेली आहे. जगभरातली सर्वच सरकारे आपल्या देशांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या करांचा बोजा नागरिकांवर टाकत असतात. ही प्रथा अलिकडची नाही तर अगदी शतकानुशतके सुरू आहे. अनेक देशांनी यापूर्वीही अजब कर लावले होते व त्यांची निष्फळता लक्षात आल्यानंतर ते रद्दही केले होते. या देशांच्या यादीत केवळ मागास देश असतील असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे. असे अजब कर लावणार्‍या देशांत अमेरिका, ब्रिटन, रशिया, जर्मनी या देशाचाही समावेश आहे.

ब्रिटनमध्ये १५ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत लोकांच्या चांगले दिसण्याच्या इच्छेचाच वापर सरकारने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी करून घेतला. या काळात डोक्यावर घालायच्या हॅट, साबणे, विग, पावडरवर टॅक्स लावण्यात आले. इतकेच नव्हे तर १७ व्वा शतकात लोक घरांना किती खिडक्या ठेवतात त्या खिडक्यांवरही कर लावला गेला. त्यानंतर घरबांधणीसाठी किती विटा वापरल्या गेल्या त्यावर कर लावला गेला. यावर बिल्डर लोकांनी विटांचा साईज वाढविला. ही चलाखी लक्षात येताच सरकारने मोठ्या विटांवर जादा कर लादला असेही समजते.

रशियातील झारला त्यांच्या ब्रिटन भेटीत तेथील उच्चवर्णीयात असलेली क्लीन शेव्ह म्हणजे गुळगुळीत दाढी करण्याची पद्धत व त्यामुळे आकर्षण दिसणारे व्यक्तीमत्त्व याची इतकी भुरळ पडली की रशियात त्याने दाढी वाढविणार्‍यांवर कर जारी केला. अमेरिकेच्या एका राज्यात टॅट्यू काढल्यास ६ टक्के कर आकारला जातो. जर्मनीत लाच देणार्‍या माणसाला करसवलत जाहीर करण्यात आली होती व ही अगदी अलिकडची म्हणजे २००२ सालातली गोष्ट आहे. जर्मनीत कांही ठिकाणी लाच देणे हे कायदेशीर होते तरीही त्या सवललीचा वापर क्वचित केला जात असे. मात्र जेव्हा हे प्रमाण वाढले तेव्हा लाच देणार्‍याने ती कुणाला दिली याची माहिती दिली की त्याला करसवलत मिळत असे. यामुळे भ्रष्टाचार करणार्‍यांची नावे समजत तसेच त्यांच्यावर आयकरही लावता येत असे. मात्र हा प्रकार म्हणावा तितका यशस्वी झाला नाहीच पण त्याचा गैरवापरच जास्त झाला.

अमेरिकेच्या कॅन्सास सिटीत हवेतील हॉट एअर बलूनवर कर लावला गेला आहे. असे बलून हे मनोरंजनाचे साधन असतात म्हणून त्यावर करमणूक कर लावला गेला मात्र त्यामुळे वादाला तोंड फुटले. अखेर जमिनीवर दोराच्या सहाय्याने बांधलेल्या बलूनवर फक्त कर लागला व उडत्या बलूनवरून तो काढला गेला. कारण त्यामुळे हाच नियम पाळून विमानांवरही कर लावावा लागला असता.

Leave a Comment