काही आरोग्यदायी सवयी

food
अनेक लोकांना आपल्या दिवसातला मोठा काळ आपल्या कामाच्या ठिकाणी घालवावा लागतो. कामाच्या नशेत त्यांच्या हे लक्षात येत नाही की एवढ्या मोठ्या प्रदीर्घ काळामध्ये आपण भूक भागवण्यासाठी अनारोग्यकारक खाद्य आणि पेये खातो आणि पितो. अनोराग्याची सवय तिथून सुरू होते. त्यामुळे ज्यांना प्रदीर्घ काळ कामाच्या ठिकाणी घालवायचा असतो त्यांनी काही आरोग्यदायी सवयींकडे लक्ष दिले पाहिजे. उदा. जाता येता काही तरी तोंडात टाकून थकवा किंवा भूक शमविण्याचा प्रयत्न करणे. अशा प्रदीर्घ काळामध्ये भूक लागते पण जेवणाची वेळ लांब असते त्यामुळे हातात सापडेल ते खाऊन भूक भागवण्याकडे कल असतो. मग चार शेंगदाणे, दोन काजू किंवा वडा असे काही तरी खाल्ले जाते. असे चारेमुरे खाण्यापेक्षा सरळ एक पोळी आणि भाजी खावी.

हे सारे खात असतानाच नकळतपणे मिठाचे सेवन अधिक होते आणि चवीसाठी आपण मीठ खात राहतो. त्याने रक्तदाबाला निमंत्रण मिळते. तेव्हा अधूनमधून खायची सवय असली तरी खारवलेले काजू, खारे बिस्किट आणि वेफर्स यांचे सेवन आवर्जुन टाळावे. अधूनमधून भरपूर पाणी प्यावे. विशेष म्हणजे कितीही प्रदीर्घ काळचे काम असले तरी एका जागेवर प्रदीर्घ काळ बसून राहू नये. तणाव टाळावा. अधून मधून दीर्घ श्‍वास घ्यावा आणि काहीतरी खाण्याची भावना व्हायला लागली की खाणे टाळून भरपूर पाणी प्यावे.