अल्कोहोलचे परिणाम तीन पिढ्यांपर्यंत

alcohol
मद्य प्राशनाचे परिणाम माणसाच्या शरीरावर तर होतातच परंतु महिलांनी गरोदर अवस्थेत मद्य प्राशन केले तर त्याचे परिणाम केवळ त्या महिलेवरच नव्हे तर पुढच्या तीन पिढ्यांवर होण्याची संभावना असते. या अवस्थेत दारू पिणार्‍या महिलेच्या मुलांमध्ये आणि नातवंडातसुध्दा मद्यपानाची आवड निर्माण होऊ शकते. शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष आधी उंदरांवर प्रयोग करून काढलेले आहेत. तिथे मादीला तिच्या पूर्ण गरोदर अवस्थेतील काळात चार वेळा एकेक ग्लास दारू पाजण्यात आली तेव्हा पुढच्या तीन पिढ्यातसुध्दा दारूची आवड निर्माण झालेली दिसली.

याच प्रयोगाचा एक भाग म्हणून दुसर्‍या पिढीतील उंदरांना एका ग्लासात पाणी आणि एका ग्लासात मद्य दिले. तेव्हा त्यांनी मद्याला आधी स्पर्श केला. पाण्याचा स्पर्शही टाळला. या मद्यपी पिढीमध्ये दारू पचन करण्याची क्षमताही वाढलेली दिसली. या पुढच्या पिढीतल्या काही उंदरांच्या शरीरामध्ये दारू इंजेक्शनद्वारे टोचली तेव्हा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यांना त्यापेक्षा कडक दारूचा डोस दिल्यानंतर मात्र ते उंदीर डुलायला लागले.