पत्नीचा तेरावा करण्याऐवजी गावातील शाळेला केले ‘डिजिटल’

karmkand
मुंबई: एका व्यक्तीने कर्मकांडांनी बुरसटलेल्या आपल्या समाजाला त्याच्या धाडसी कार्यातून चांगलीच चपराक दिली आहे. पत्नीच्या निधनानंतर कोणत्याही कर्मकांडावर केला जाणार खर्च या व्यक्तीने टाळला असून तो सर्व पैसा गावातील शाळा डिजीटल करण्यात मोठे योगदान दिले आहे. या व्यक्तीचे आणि त्याच्या कार्याचे सध्या राज्यभरातून कौतुक केले जात आहे. अकोला जिल्ह्यातील तांदळी बूझरूक गावातील अविनाश नाकट या सामाजिक आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याने आपल्या कृतीतून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.

हिंदू धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंतर दशक्रिया, तेरावे, गोडजेवण, पिंडदान, अस्थीविसर्जन या कर्मकांडांना मोठे महत्व दिले जाते आणि जाणा-या माणसाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अनेकजण पैसे नसतानाही पैसे उसणे घेऊन ह्या क्रिया पार पाडतात. पण एक वेगळाच पायंडा आता अविनाश नाटक यांनी मांडून दिला आहे. पत्नीच्या निधनानंतर लागणा-या कर्मकांडासाठीचे दिड लाख रूपये वाचवून त्यांनी गावातील शाळा डिजीटल करून या शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. नुकतेच २२ फेब्रुवारीला या शाळेचे लोकार्पण करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील सामाजिक आणि शेतकरी चळवळीतील अलिकडच्या पिढीतले मोठे नाव अविनाश नाकट. पण, त्यांच्या सुखी संसारावर कळाने घाला घातला आणि ५ फेब्रुवारीला त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांचा संसार अर्ध्यावर तुटला. तर त्यांच्या दोन मुली आईच्या प्रेमाला पोरक्या झाल्या. अविनाश ‘युवाराष्ट्र’ या सामाजिक व्यासपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी कायम झपाटलेला तरूण. पत्नी रूपालीने त्याला अनेकदा गावातील जिल्हा परिषद शाळेला नवीन रूप देण्याचा विचार बोलून दाखविला. पण हे प्रत्यक्षात होण्याआधी अचानक रूपालीने या जगाचा निरोप घेतला. पण पत्नीच्या गेल्यानंतर अविनाशने पत्नीला आदरांजली देण्यासाठी गावातील शाळा ‘डिजिटल’ करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना समाजातून अनेक विरोध पचवावे लागले. पण ते डगमगले नाहीत.

अविनाश यांच्या पत्नी रूपाली यांचे ५ फेब्रुवारीला निधन झाले आणि १० फेब्रुवारीपासून गावातील ‘डिजिटल शाळे’च्या कामाला सुरुवात झाली. तांदळीत जिल्हा परिषदेची १ ते ७ अशी शाळा आहेत. वर्गात प्रोजेक्टर, डिजिटल स्क्रीन फळा आणि सर्व वर्गांच्या अभ्यासाचे अॅप्स अशा सर्व गोष्टींनी शाळा आज सज्ज झाली आहे. या सर्व कामांसाठी जवळपास दिड लाख रूपयांचा संपूर्ण खर्च अविनाश यांनी उचलला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अविनाश हे काम करून येथेच थांबले नाहीतर त्यांनी पुढच्या काळात या उपकरणांच्या देखभालीचा खर्चही अविनाश यांनीच उचलला आहे. अविनाश यांचे हे धाडसी कार्य अनेकांना प्रेरणादायी आणि नव्या विचारांना चालना देणारे आहे.

Leave a Comment