फिल्टरच्या खर्चात बचत

pradhan
अहमदाबाद येथे कार्यरत असलेल्या नॅशनल इनोव्हेशन फौंडशन ऑफ इंडिया या संस्थेने आयोजित केलेल्या इग्नाईट २०१५ या कार्यक्रमात देशभरातल्या अनेक बालशास्त्रज्ञांच्या आणि युवा संशोधकांच्या संशोधनाच्या प्रतिकृती दाखल झाल्या. देशभरातून २८ हजार प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यातल्या ३१ जणांच्या संशोधनाला पुरस्कार देण्यात आले. त्यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यातील सर्वात कमी वयाचे संशोधक म्हणून सिक्किममधील सोरिंग लेप्चा आणि सुभाष प्रधान या दोघांची निवड झाली.

सोरिंग लेप्चा हा चौथीत शिकणारा मुलगा आहे तर सुभाष प्रधान हा पाचवीतला विद्यार्थी आहे. या दोघांनी पाणी शुध्द करण्याच्या पध्दतीत सुधारणा सुचवणारे प्रकल्प सादर केले होते. हे दोघेही एकाच शाळेत शिकतात. त्यांच्या शाळेत पिण्याच्या पाण्याचा हौद आहे परंतु त्याचा नळ सुरू केला की घाण पाणी बाहेर येते. अशा पाण्यामुळे रोगराई होण्याची शक्यता असल्यामुळे हे दोघेही अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांना चालना मिळाली आणि त्यांची संशोधने समोर आली.

या दोघांनीही असे पाहिले की पाण्यापासून होणारा धोका टाळायचा असेल तर लोकांना आपल्या घरी वॉटर प्युरिफायर किंवा फिल्टर बसवावे लागेल. ही गोष्ट गरीब लोकांना शक्य नाही. तेव्हा त्यांनाही फार खर्च न करता शुध्द पाणी कसे प्राप्त करता येईल यावर दोघांचाही विचार सुरू झाला. सोरिंग लेप्चा याने असा फिल्टर तयार केला आहे की जो गावाला पाणी पुरवणार्‍या टाकीलाच बसवता येतो. सुभाष प्रधान याने असा फिल्टर तयार केला आहे की जो आपण ज्या नळातून पाणी घेतो त्या नळाला बसवता येईल. म्हणजे गरीब लोकांना पाण्याच्या स्रोतापासूनच फिल्टर पाणी देण्याची सोय होईल. या दोघांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या मान्यवरांना त्यांच्या फिल्टरचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

Leave a Comment