केवळ ५ सेकंदात डाऊनलोड होणार तीन तासांचा व्हिडिओ !

5-G
लंडन: सध्या मोबाईल इंटरनेटसाठी उपलब्ध असलेले सर्वाधिक वेगवान तंत्रज्ञान ४-जी हे अद्याप जगाच्या अनेक भागापर्यंत पोहोचलेले नाही. मात्र त्याच्यापेक्षा तब्बल १०० पट वेगवान असणारे ५-जी तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न इंग्लंड येथील शास्त्रज्ञांनी सुरू केले आहेत. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आल्यावर त्याच्या वेगामुळे एखादा चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी पुरणार आहेत केवळ ५ सेकंद!

दक्षिण लंडनमधील गिल्डफर्ड येथे सरे विद्यापीठाच्या कँपसमध्ये ५-जी इंटरनेट विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामध्ये सॅमसंग आणि फुजित्सु यांच्यासह चीन, अमेरिका स्वीडन या देशातील कंपन्यांचा सहभाग असून कंपन्यांनी त्यासाठी कित्येक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर सन २०१८ पासून करता येईल; असा विश्वास या संशोधन प्रकल्पात काम करणाऱ्या संशोधकांना वाटतो. या तंत्रज्ञानाने केवळ मोबाईल फोनच नव्हे तर घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कार यांनाही इंटरनेटने जोडता येईल; असा त्यांचा दावा आहे.

एटी अँड टी, जपानची डोकोमो, एरिकसन अशा कंपन्यांनीही ५-जी तंत्रज्ञान विकसित करण्यात पुढाकार घेतला असून सर्वप्रथम हे संशोधन वापरात आणण्याचे श्रेय मिळविण्याबरोबरच त्याचा व्यावसायिक लाभ उठविण्याचाही या कंपन्यांचा उद्देश आहे.

हे तंत्रज्ञान सन २०१८ पर्यंत विकसित करण्यात संशोधकांना यश आले तरी त्याच्या सार्वत्रिक वापराबद्दल वैश्विक नियमावली तयार झाल्याशिवाय त्याचा व्यावसायिक वापर करत येणार नाही आणि ही नियमावली तयार होण्यास किमान २०१९ साल उजाडेल; असे या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते.

Leave a Comment