अंगभर रामनाम गोंदवणारे रामनामी

ramnami
छत्तीसगढ राज्यात चार जिल्हात पसरलेला रामनामी समाज गेली १०० वर्षे एक अनोखी परंपरा सांभाळत आहे. येथील अनेकांनी आपल्या सर्वांगावर रामनाम गोंदवून घेतले आहे. हा समाज आजही मंदिरात जात नाही, पूजा अर्चा करत नाही तर अंगावर गोंदविलेले रामनाम आणि तोंडाने रामनामाचा जप हीच त्यांची पूजा आहे. यामागे देवाची भक्ती हे जसे कारण आहे तसेच ते बंडखोरीचेही लक्षण आहे.

छत्तीसगडच्या चार जिल्ह्यात मिळून हा रामनामी समाज विखुरला असून त्यांची लोकसंख्या आहे १ लाखांच्या आसपास. मेहतर समाजातील या लोकांना कांही उच्चवणीय हिदूंनी मंदिरात येऊ दिले नव्हते व त्याविरोधात बंडखोरी म्हणून ही प्रथा १०० वर्षांपासून पाळली जात आहे. आजही संपूर्ण अंगावर रामनाम गोंदविलेले लोक आहेत. येथे बालक जन्मल्यानंतर त्याच्या छातीवर रामनाम गोंदविले जाते. आजकाल या समाजातील अनेक युवक नोकरी व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडतात मात्र तेही संपूर्ण अंगावर नाही तर शरीराच्या कुठल्यातरी भागावर आवर्जून रामनाम गोंदवितात कारण तीच त्यांची ओळख बनली आहे. येथील लोक दररोज रामनामाचा जप करतातच पण घरांच्या भिंतीवरही रामनाम लिहिलेले असते.

या समाजातील बुजुर्ग सांगतात, येथे रामनाम छापलेले कपडे घातले जातात, एकमेकांना रामराम म्हणूनच संबोधतात. शरीराच्या कुठल्याही भागावर रामनाम गोंदविलेले असेल तर त्याला रामनामी, कपाळावर गोंदविले असेल तर त्याला शिरोमणी, संपूर्ण कपाळभर गोंदविलेल्याला सर्वांग रामनामी तर शरीरभर गोंदविलेल्यांना नखशिख रामनामी म्हटले जाते. या समाजाची सरकारीदरबारी रितसर नोंदणी झाली आहे आणि त्यांच्यातही दर पाच वर्षांनी लोकशाही पद्धतीने निवडणुका होतात.

Leave a Comment