नवी एम्स आणि कर्करोग उपचार केंद्र उभारणार

J-p-nadda
गुवाहाटी: नागरिकांना प्रभावी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने १७ नवीन एम्स आणि २० कर्करोग उपचार केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नढ्ढा यांनी दिली.

गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी विभागाच्या पायाभरणी समारंभानंतर ते बोलत होते. नव्या एम्सच्या उभारणीनंतर यामध्ये १६ हजार ३०० खाटांची सुविधा रुग्णांना उपलब्ध होणार आल्याचा दावा त्यांनी केला.

जझ्झर येथे ७१० खाटांची सुविधा असलेली राष्ट्रीय कर्करोग उपचार संस्था तर कोलकाता येथे चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्था यांची उभारणी केली जात असून याशिवाय ५० प्रादेशिक कर्करोग उपचार केंद्रही उभारली जाणार आहेत; असे त्यांनी सांगितले.

देशातील ७० वैद्यकीय महाविद्यालये आणि ५८ जिल्हा रुग्णालये येथे सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करणार असल्याचे सांगून नढ्ढा म्हणाले की; मिशन इंद्रधनुष, कायाकल्प, अमृत, नव्या लशींचे संशोधन, एड्स नियंत्रण कार्यक्रमाला वेग देणे या कामांना आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान देशासमोर असून त्यासाठी आगामी ३ वर्षात मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण करण्यात येईल; असेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण आणि शहरी भागात किफायतशीर दरात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.