१२५ टक्के होणार महागाईभत्ता !

central-government
नवी दिल्ली : आपल्या कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात केंद्र सरकार सहा टक्के वाढ करण्याची शक्यता असून हा भत्ता ११९ टक्क्यांवरून १२५ टक्क्यांवर नेण्यात येणार आहे. म्हणजे ६ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फायदा १ कोटी कर्मचारी व निवृत्तीधारकांना होणार आहे.

या महागाईभत्ता वाढीसाठी केंद्र सरकारने जानेवारी ते डिसेंबर २०१५ दरम्यान ग्राहक किंमत निर्देशांक (औद्योगिक कामगार) ६.७३ टक्क्यांचा आधार घेतला आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला, अशी माहिती केंद्र सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. के. एन. कुट्टी यांनी दिली. हा महागाईभत्ता १ जानेवारी २०१६ पासून लागू होणार आहे. याचा लाभ ४८ लाख केंद्रीय कर्मचारी व ५५ लाख निवृत्तीधारकांना होणार आहे. सध्या महागाईचा दर २२० ते २४० दरम्यान असून आम्हाला केवळ १२५ टक्के वाढ दिली जाते, असे कुट्टी म्हणाले.

केंद्र औद्योगिक कर्मचा-यांसाठी वर्षभरात दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ करते. याआधी सप्टेंबरमध्ये भत्ता ११३ टक्क्यांहून ११९ टक्के करण्यात आला होता. हा निर्णय जुलै २०१५ पासून अंमलात आला होता. केंद्र सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. के. एन. कुट्टी यांनी सांगितले की, महागाईभत्ता वाढीचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने कॅबिनेटकडे पाठविला आहे. कॅबिनेटचा हिरवा कंदिल मिळाल्यानंतर हा महागाईभत्त्यातील वाढ लागू करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर महागाईभत्त्यातील ही ६ टक्के प्रस्तावित वाढ खूप कमी आहे. सध्या रिटेल महागाई दर २२०-२४० टक्केच्या दरम्यान आहे. मात्र आम्हाला केवळ १२५ टक्केही भत्ता मिळतो.

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये देखील महागाईभत्त्यात ६ टक्क्यांनीच वाढ केली होती. नुकताच महाराष्ट्र सरकारने देखील केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी व अधिका-यांच्या महागाई भत्यात ६ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महागाई भत्त्याचा दर ११३ टक्क्यांवरून ११९ टक्के इतका झाला आहे. वाढीव महागाईभत्ता फेबु्रवारी महिन्याच्या वेतनात रोखीने दिला जाणार आहे.

Leave a Comment