रशियन शर्प एटीव्ही अॅंफिबियन गाडी

shrp
सौंदर्यस्पर्धांप्रमाणेच जशी सर्वाधिक कुरूप स्पर्धा असते त्याप्रमाणे वाहनांतही जर सर्वाधिक विचित्र वाहन स्पर्धा जाहीर झाली तर त्यात एकमुखाने रशियन शर्प एटीव्ही या वाहनाची नक्कीच निवड होईल. दिसायला कॉन्सेप्ट कार वाटणारे हे वाहन जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी यशस्वीपणे चालतेच पण प्रत्यक्षात कांहीसे ऑड वाटणारे हे वाहन अनेक जबाबदार्‍या पार पाडणारे आहे.

रशियात या वाहनाच्या निर्मितीची सुरवात २०१२ साली झाली आणि या टीमचे नेतृत्व केले तंत्रज्ञानातील जाणकार अलेक्सी गार्गाशिया यांनी. जगातल्या कोणत्याही भूभागावर आणि कोणत्याही परिस्थितीत चालू शकेल असे वाहन त्यांना तयार करायचे होते आणि त्यांनी असे वाहन बनविण्यात यशही मिळविले. खरे तर या वाहनाला चालण्यासाठी रस्त्याचीही गरज नाही., जंगले, झाडी, शेते, पहाडी भाग, नदी नाले ओढे असे कुठेही ते जाऊ शकते.

या वाहनाला शर्प एटीव्ही असे नांव दिले गेले आहे. त्याला चार मोठी चाके आहेत आणि त्यावर कॉम्पॅक्ट बॉडी दिली गेली आहे. चार सीटची क्षमता असलेल्या या वाहनाला १.५ लिटरचे ४ सिलींडर टर्बो डिझेल इंजिन, ऑनबोर्ड जनरेटर व ५० लिटरचा फ्यूएल टँक दिला गेला आहे. लहान इंजिन क्षमतेमुळे या वाहनाचे वजन अवघे १३०० किलो आहे. जमिनीवरून ताशी ४५ किमी वेगाने तर पाण्यातून ते ताशी ६ किमी वेगाने जाऊ शकते. त्याला पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले गेले आहे. अमेरिकेत या वाहनाची किंमत आहे ४३ लाख रूपये.

Leave a Comment