विद्यार्थ्याला स्नॅपडीलने अखेर ६८ रुपयांत दिला आयफोन ५एस!

nikhil-bansal
नवी दिल्ली : एका विद्यार्थ्याला स्नॅपडील या कंपनीने आयफोन ५एस फक्त ६८ रूपयात दिला, तुम्हालाही हा फोन मिळाला असता जर निखिल बन्सल सारखी हुशारी तुम्ही दाखवली असती. ही हुशारी दाखवली आहे पंजाबमधील निखील बन्सल या विद्यार्थ्याने. सध्या त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

पंजाब विद्यापीठातील बी. टेकचा विद्यार्थी असलेला निखील हा जगातील निवडक नशिबवानांमधील एक आहे, असे म्हटले तरी वावग ठरणार नाही. निखील बन्सलने स्नॅपडील या ऑनलाईन रिटेलर वेबसाईटवर एक जाहिरात पाहिली. या जाहिरातीनुसार १६ जीबीचा आयफोन ५एस केवळ ६८ रुपयांत उपलब्ध होता. मागचा-पुढचा विचार न करता निखीलने थेट आयफोनची ऑर्डर दिली. पण स्नॅपडीलने निखीलला आयफोनची डिलिव्हरी देण्यास नकार दिला.
ऑर्डर स्वीकारल्यानंतरही स्नॅपडील डिलिव्हरी करत नसल्याने संतप्त निखील बन्सलने स्नॅपडीलविरोधात थेट ग्राहक न्यायालायात धाव घेतली. विशेष म्हणजे ग्राहक न्यायालयात स्नॅपडीलच्या विरोधात आणि निखीलच्या बाजूने निकाल लागला. निखीलला ६८ रुपयांत आयफोन ५एस देण्यासोबत २ हजार रुपयेही देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने स्नॅपडीलला दिले.

मात्र, स्नॅपडीलने ग्राहक न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी दर्शवत ग्राहक मंचाकडे धाव घेतली. निखीलच्या बाजूने लागलेल्या निर्णयाला स्नॅपडीलने ग्राहक मंचामध्ये आव्हान दिले. मात्र, येथे देखील स्नॅपडीलचा पराभव झाला आणि आयफोन ५एस सह २ हजार रुपयांऐवजी १० हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाने स्नॅपडीलला दिले.

Leave a Comment