मुंबईत सजताहेत डिझायनर टॅक्सी

taxi
मुंबईची ओळख असलेल्या काळ्यापिवळ्या टॅक्सी बाहेरून त्याच रूपात दिसत असल्या तरी कांही टॅक्सी आतून मात्र रंगबिरंगी झाल्या आहेत. संकेत अवलानी या डिझायनरच्या कल्पनेतून आकार घेतलेल्या टॅक्सी फॅब्रिेक या प्रोजेक्टने ही किमया साधली आहे. या निमित्ताने फॅब्रिक डिझायनर्सनाही त्यांची कला दाखविण्याची संधी मिळाली आहे.

संकेतच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील कांही फॅब्रिक डिझायनर्स एकत्र आले आहेत आणि त्यांनी टॅक्सीच्या आतील भाग डिझायनर फॅब्रिकने आकर्षकपणे सजविले आहेत. यातून कांही सामाजिक संदेश, बॉलीवूड कलाकारांचे लोकप्रिय डायलॉग चितारले गेले आहेत. मुंबईत टॅक्सी वाहतूकीचे प्रमाण खूपच मोठे असून दररोज लाखो लोक प्रवासासाठी टॅक्सीचा वापर करतात. संकेतने ही बाब हेरून त्यांच्या कलेच्या प्रदर्शनासाठी त्याच्या चार मित्रांसह टॅक्सी फॅब्रिक प्रोजेक्ट हाती घेतला. अल्पावधीत त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे व हा प्रोजेक्ट अमेरिकन वेबसाईटवरही दाखल झाला आहे.

संकेत सांगतो, यासाठी आम्ही टॅक्सीचालक किंवा मालकांकडून पैसे घेत नाही तर टॅक्सी सजविण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्या वेळचे भाडेही देतो. याप्रकारे आम्ही ३० टॅकसी सजविल्या आहेत आणि आणखी २५ सजवित आहोत. या नव्या कल्पनेला भारतातून कांही आर्थिक मदत आली नाही मात्र अमेरिकी वेबसाईटवर माहिती आल्यानंतर विदेशातून आर्थिक मदत मिळाली. हाच प्रयोग आम्ही ऑटो रिक्षातही करणार आहोत.

डिझायनर टॅक्सीचालक सांगतात, टॅक्सी आतून पाहिली की प्रवासी खूष होतातच पण लहान मुले तर आनंदाने टाळ्या वाजवितात. या डिझाईनमध्ये मूकबधिरांसाठी साईन लँग्वेजही फॅब्रिकमध्ये समाविष्ट केली गेली आहे.

Leave a Comment