पाताळाचा रस्ता असलेले दुर्लभ शिवलिंग

kharaud
छत्तीसगड राज्याची काशी अशी ओळख झालेल्या खरौद नगर येथे दुर्लभ शिवलिंग असलेले शिवमंदिर आहे. लक्ष्मणेश्वर मंदिर असे नांव असलेल्या या मंदिरातील शिवलिंगावर १ लाख छिद्रे आहेत व यातील एक छिद्र म्हणजे पाताळाचा रस्ता आहे असे मानले जाते. शबरी उद्धार केल्यानंतर व लंका विजयानंतर लक्ष्मणाने पापक्षालनासाठी रामाला शिवलिंग स्थापन करण्याची विनंती केली तेव्हा रामाने या महादेवाची स्थापना केली असे सांगितले जाते. रामायणकालीन या मंदिराचा जीर्णोद्धार रतनपूरचा राजा खड्गदेव याने केला. हे मंदिर सहाव्या शतकातले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो.

या छिद्रमय लिंगातील एका छिद्रात कितीती पाणी ओतले तरी ते छिद्र भरत नाही. हे पाणी थेट पाताळात जाते असे समजले जाते व त्यामुळे तो पाताळाचा मार्ग असल्याची भावना आहे. या मंदिरामागची कथा अशी सांगतात, की रावण वध केल्यानंतर रामाला ब्रह्महत्येचे पातक लागले कारण रावण ब्राह्मण होता. त्या पापक्षालनासाठी रामेश्वरावर अभिषेक केला गेला तेव्हा अभिषेकासाठी लक्ष्मण सर्व पवित्र प्रमुख तीर्थे आणण्यासाठी गेला तेव्हा त्याने या गुप्त तीर्थ शिवरीनारायण येथील पाणीही आणले. मात्र येथून पाणी नेऊन अयोध्येकडे येताना लक्ष्मण खूप आजारी पडला. त्यातून मुक्त होण्यासाठी लक्ष्मणाने महादेव पूजा केली व रामाला येथे महादेवाची स्थापना करण्याची विनंती केली.

रामाने येथेच खर व दूषण या दोन राक्षसांचा वध केल्याचेही सांगितले जाते. त्यावरूनच या जागेचे नांव खरौद असे पडले आहे. या मंदिराच्या बाहेरच जीर्णोद्धार केलेला राजा खड्गदेव त्याची राणी हात जोडून प्रदक्षिणा मार्गावर उभे असल्याच्या मूर्ती आहेत. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो व महादेवाची वरात काढली जाते.

Leave a Comment