अखेर जुळल्या रेशीमगाठी

pramod
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असा आपल्या समाजात एक समज आहे. लग्नाचा योग नशीबात असावा लागतो व तो असला तर कोणत्याही परिस्थितीत लग्नगाठ बांधली जातेच याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अलाहाबाद जवळच्या जिंद गावचा रहिवासी प्रमोदकुमार केसवानी. प्रमोद दीर्घ प्रतीक्षेनंतर नुकताच विवाहबद्ध झाला असून त्याला त्याच्या योग्य वधूही मिळाली आहे. तिचे नांव आहे प्रतीक्षा.

भगवान के घर देर है अंधेर नहीं या उक्तीचा प्रमोदकुमारला पुरेपूर अनुभव आला आहे. याचे कारण म्हणजे प्रमोदकुमारची उंची आहे अवघी दोन फूट. तो किराणा मालाचे एक छोटेसे दुकान चालवितो. त्याला लग्न करण्याची खूप इच्छा होती पण त्याच्या उंचीला साजेसी मुलगी मिळत नव्हती. प्रमोदकुमार या प्रतीक्षेत ४४ वर्षांचा झाला आणि त्याच्या लग्नाचा योग आला.

झाले असे की त्याचा एक दोस्त राजू जरी बाजारात गेला असताना त्याला प्रमोदच्या उंचीची मुलगी दिसली. मग राजूने स्थानिक लोकांच्या मदतीने तिच्या घराचा पत्ता मिळविला व प्रमोदच्या कुटुंबाला माहिती दिली. दोन्ही कुटुंबाची गाठभेट झाली आणि प्रमोदकुमारच्या डोक्यावर अक्षता पडल्या. प्रतीक्षा लडीयारी गावची असून ३३ वर्षांची आहे. तिचे लग्नही उंचीमुळे जमत नव्हते. या लग्नाने प्रमोद आणि प्रतीक्षा आनंदले आहेत. प्रतीक्षाने सासरच्या लोकांची सेवा मनापासून करेन असे सांगितले.

Leave a Comment