‘स्मार्ट’होणार एक्स्प्रेस रेल्वेचे डबे

railway
नवी दिल्ली : दिवसेंदिवस स्मार्ट होत चाललेल्या जगाचा आदर्श घेत रेल्वेनेदेखील स्मार्ट होण्याचे ठरविले असून याची सुरुवात प्रवाशांसाठी महत्त्वाचे असलेल्या एक्स्प्रेस रेल्वेच्या डब्यापासून होणार आहे. सध्याचे गलिच्छ डबे आता स्मार्ट होणार आहेत. फेब्रुवारीअखेर संसदेत मांडल्या जाणा-या रेल्वे अर्थसंकल्पात स्मार्ट एक्स्प्रेस रेल्वेचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. त्यानुसार रेल्वे डब्यांमध्ये विमानातील सुविधांच्या धर्तीवर बदल करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रवास आरामदायी करणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर रेल्वेतील आरामदायी आसनांसोबत जीपीएसच्या गजराची सुविधा मिळणार आहे.

आरक्षित डब्यात एलईडी आरक्षण तक्ता आणि दिशादर्शकांसह वायफाय सेवादेखील उपलब्ध होणार आहे. विमानाप्रमाणेच रेल्वेच्या डब्यातही प्रवाशांना सर्व प्रकारची माहिती दिली जाणार आहे. प्रवाशांच्या नावाची उद्घोषणा करतानाच एक्स्प्रेसमधील टीसीसोबत संवाद साधण्याची सुविधा असणार आहे. चहा, कॉफी आणि पाणी वेडिंग मशिन्सद्वारे पुरविले जाईल. रेल्वे प्रवासात असताना फोन किंवा लॅपटॉपची बॅटरी उतरल्यास चार्जिंगचा यक्ष प्रश्न उभा राहतो. स्मार्ट डब्यामध्ये प्रवाशांना चार्जिंगची सुविधा मिळणार आहे. नव्या डब्यातील दरवाजे स्वयंचलित असतील तसेच डब्यात मायक्रोप्रोसेसर एसी असेल. नव्या गाड्यांमध्ये अत्याधुनिक शौचालय बनविली जाणार असून त्यामध्ये सेन्सर व फ्लशिंगची सुविधा असेल शिवाय शौचालयाबाहेर इंडिकेटर्स असतील. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे , फायर व स्मोक अलार्मही असतील.

Leave a Comment