पुन्हा भडकणार पेट्रोल, डिझेलचे भाव

petrol
मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्याने घसरण होत असल्याने यापासून मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नातही लक्षणीय घट झाल्याचा सर्वात मोठा फटका महापालिकेच्या अर्थव्यवस्थेला बसल्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी कच्च्या तेलावरील जकातीचा दर तीन टक्क्यांवरून ४.५ टक्के करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे़

जकात करातून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा ४४ टक्के महापालिकेच्या उत्पन्नात आहे़. यात ४० टक्के उत्पन्न कच्चा तेलाच्या जकातीपासून मिळते. मात्र गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्चा तेलाच्या किमती ११० डॉलर प्रति बॅरलवरून ३२ डॉलर एवढ्या खाली आल्या आहेत. जकात कर हा आयात केलेल्या मालाच्या किमतीवर आकारण्यात येत असल्यामुळे पर्यायाने जकातीचे उत्पन्नदेखील कमी झाले आहे़

जकातीचे १२०० कोटी रुपये उत्पन्न या आर्थिक वर्षात कमी जमा झाल्यामुळे पालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे़ त्यामुळे कच्च्या तेलाच्या जकात करामध्ये वाढ करण्याचे संकेत अर्थसंकल्पातूनच आयुक्त अजय मेहता यांनी दिले होते़ त्यानुसार पंधरवड्यातच हा करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने मंजुरीसाठी आणला आहे़ पालिका महासभेच्या अंतिम मंजुरीनंतर ही करवाढ अमलात येणार आहे़.

Leave a Comment