आता युरोपातही धावणार ‘मारुती बलेनो’

baleno
नवी दिल्ली: मागील वर्षभरात देशभर मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘मारुती’ची ‘बलेनो’ ही ‘प्रीमियम हॅचबॅक’ प्रकारातील कार आता युरोपातील रस्त्यांवरही धावणार आहे. ही गाडी याच महिन्यापासून युरोपात निर्यात होणार आहे.

‘मारुती’च्या विविध प्रकारातील गाड्यांना भारतात मोठा प्रतिसाद मिळत असला तरी निर्यातीच्या बाबतीत कंपनीची कामगिरी फारशी दमदार झालेली नाही. कंपनीच्या ‘स्विफ्ट’ आणि ‘सेलेरिओ’ या गाड्या निर्यात होत असल्या तरीही त्यांना ‘निस्सान’ आणि ‘ह्युंदाई’ या कंपन्यांच्या कडव्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते.

या पार्श्वभूमीवर इटली, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, डेन्मार्क आणि स्पेन या देशांमध्ये आपले पाय रोवण्याचा ‘मारुती’चा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनीने ‘बलेनो’ची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंद्रा बंदरातून याच महिन्यात युरोपकडे रवाना होत आहेत.

या शिवाय ‘मारुती सुझुकी वितारा ब्रेझा’ ही ‘सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही’ लवकरच बाजारपेठेत येत असून आणखी काही नव्या मॉडेल्सच्या गाड्या विकसित करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

Leave a Comment