४५२ जणांच्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा घालून देणारा अवलिया

drink
नागपूर : अनेकांचे संसार दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होतात. विशेष करून एका व्यक्तीच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंबाची होरपळ होते. अनेकींना दारूड्या पतीमुळे माहेरची वाट धरावी लागते. समाजातील हे भीषण वास्तव लक्षात घेऊन दारूच्या व्यसनांमुळे ४५२ जणांची विस्कटलेली संसाराची घडी पुन्हा घालून देणारा पूर्णचंद्र झिटूजी मेश्राम हा अवलिया आज समाजासमोर आदर्श ठरला आहे. समाजसेवेत आज वयाच्या पासष्टीतही ते अग्रेसर आहेत. अनेकांचे ते प्रेरणास्रोत आहेत.

नागपूर शहरातील आकाशनगर, मानेवाडा चौक येथे राहणारे पूर्णचंद्र मेश्राम १९७० मध्ये शासकीय सेवेत रूजू झाले. ४० वर्षे शासकीय सेवेत असताना त्यांना अनेकांचे संसार दारूने नेस्तनाबूत होताना दिसले. त्यामुळे त्यांनी नोकरीसह समाजसेवेचेही व्रत स्वीकारले. दारूचे व्यसन असलेल्या अनेकांची त्यांनी भेट घेतली. दारू पिण्याची कारणे आणि स्थितीबाबत सखोल अभ्यास केला. त्यांनी दारू सोडविण्यासाठी दारूड्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. कोणत्याही दैवी शक्तीवर विश्वास न ठेवता त्यांनी मद्यपींची व्यायाम, प्रवचन आणि काही वनौषधींच्या माध्यमातून दारू सोडविण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी ४५२ जणांची मने वळवून सन्मार्गाला लावले. आज त्या सर्वांचे संसार सुरळीत सुरू आहेत. अनेकींनी पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून माहेर गाठले होते. मात्र, त्या मद्यपींचे मद्य सोडवून त्यांच्या पत्नी आणि माहेरच्यांशी संपर्क साधून त्यांच्या संसाराची घडी पुन्हा बसवून देण्याचे काम पूर्णचंद्र यांच्या हातून घडले. या कार्यात त्यांची पत्नी मनोरमा यांनीही त्यांना मोलाची साथ दिली.

बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या मेश्राम यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आतापर्यंत पाच पुस्तकांचे लिखाण केले असून, २० हजार लोकांना निरोगी राहण्याचे उपाय आणि काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. ६५ व्या वर्षीही त्यांना कोणताच आजार नाही. गेल्या ४० वर्षांपासून ते डॉक्टरांकडे गेले नाहीत. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी युवकांना पोलिस, सैनिक आणि रक्षक दलात जाण्यासाठी प्रशिक्षण दिले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे आजपर्यंत १०७ जण शासकीय सेवेत नोकरी करीत आहेत. मेश्रामांच्या घरी १० हजार पुस्तकांचा ठेवा असून अनेक विषयांवर त्यांचे लिखाण सातत्याने सुरू असते. जिल्हाधिका-यांच्या हस्ते व्यसनमुक्ती पुरस्कार तर दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशीप पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. यापुढेही मद्यपींना व्यसनमुक्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.