काय सुचवितो फेसबुकचा नवा लोगो

face
सोशल मिडीया साईट फेसबुकने आपली तपपूर्ती म्हणजे १२ वर्षे पूर्ण केली आहेत आणि या साईटचा वापर वैयकितक, कार्पोरेट व मार्केटिंगसाठीही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. फेसबुक युजरची संख्या दररोज वाढत चालली असतानाच या साईटवर अनेक बदलही केले जात आहेत. फेसबुकने त्यांचा लोगोही बदलला आहे. या लोगोमधून नक्की काय सूचित करायचे असावे अशा प्रश्न पडला असेल तर द नेक्स्ट वेबसाईटचा संचालक मॅट नवारा यांनी तो उलगडून सांगितला आहे.

मॅटच्या मते फेसबुकचा इंग्रजी लिपीतील छोटा एफ उभे राहून फोनवर फेसबुक पाहणार्‍या मानवी आकृतीशी साधर्म्य दाखविणारा आहे. अर्थात फेसबुककडून याला दुजोरा दिला गेलेला नाही. सध्या जगात दर १३ जणांमागे एक फेसबुक युजर आहे आणि ७० भाषांमधून ही सेवा दिली जात आहे. फेसबुकबाबत अज्ञात असलेल्या आणखीही कांही गोष्टी आहेत. फेसबुकच्या अभियंत्यांची लाईक बटणला ऑसम बटण असे नांव द्यावे अशी इच्छा होती.

असेही समजते की फेसबुक हॅक करण्यासाठी दररोज जगभरातून किमान ६ लाख वेळा प्रयत्न केला जातो. युजरने साईन आऊट केल्यानंतरही त्याने फेसबुकवर भेट दिलेल्या साईट ट्रॅक केल्या जातात. कितीही प्रयत्न केले तरी संस्थापक मार्क झुकेरबर्गला युजर्स फेसबुकवर ब्लॉक करू शकत नाहीत. या साईटवर दररोज सरासरी ३५० दशलक्ष फोटो अपलोड होतात व दररोज ७४५ दशलक्ष युजर फेसबुकचा वापर करतात.