लवकरच ऑनलाईन पीएफ काढण्याची सुविधा

epfo
नवी दिल्ली : येत्या ऑगस्ट महिन्यापासून पीएफधारकांना ऑनलाईन पीएफ काढण्याची सुविधा कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना (ईपीएफओ) उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे कागदी घोडे नाचविण्याचे काम कमी होईल. अर्थात, पीएफधारकांना मिळणारी सुविधादेखील सोयीची असेल. या सुविधेमुळे पीएफ काढण्याच्या प्रक्रियेला काही तासांचाच अवधी लागणार आहे. यातून भविष्यात पीएफधारकांची परवड कमी होण्यास मदत होणार आहे

ईपीएफओच्या वरिष्ठ अधिका-यांनी ही सुविधा ऑगस्टपर्यंत उपलब्ध होईल असे यासंदर्भात माहिती देताना सांगितले. ईपीएफओने अगोदरच आपले रेकॉर्ड आणि प्रक्रियेला डिजिटल रूप दिले आहे. यासाठी ओरॅकल ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला आहे. ईपीएफओ गुडगाव, दिल्लीतील द्वारका आणि सिकंदराबाद या तीन ठिकाणी सेंट्रल डाटा केंद्र स्थापित करण्यासाठी लवकरच ब्लेड सव्र्हर खरेदी करणार आहे. हे तिन्ही केंद्रे ईपीएफओच्या १२३ कार्यालयांना जोडले जातील.

सव्र्हर खरेदी करण्याचे काम मेपर्यंत पूर्म होईल आणि जूनपासून याची चाचणी घेण्यात येईल. जून आणि जुलै महिन्यात या प्रक्रियेची बारकाव्याने चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर ऑगस्टमध्ये ऑनलाईन पीएफची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर पीएफधारक ऑनलाईन पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. त्यानंतर पीएफची रक्कम थेट पीएफधारकाच्या खात्यात जाऊन पडेल. दरम्यान, भारतीय कामगार संघटनेसह सर्वच कामगार संघटनांनी चालू आर्थिक वर्षाच्या पीएफवर ९ टक्के व्याज देण्याची मागणी लावून धरली आहे.

सध्याच्या ८.७५ टक्के व्याजासह सर्वांना २०० रुपये बोनस देण्याच्या भूमिकेला सर्वच कामगार संघटना विरोध करतील, असेही स्पष्ट करण्यात आले. १६ फेब्रुवारी रोजी ईपीएफओच्या ट्रस्टींची बैठक होत आहे. त्या दरम्यान आम्ही चालू आर्थिक वर्षासाठी ९ टक्के व्याज देण्याची मागणी लावून धरू, असे भारतीय मजदूर संघाचे महासचिव ब्रिजेश उपाध्याय यांनी सांगितले.

Leave a Comment