जगातील सर्वांत अचूक घड्याळाची निर्मिती

atomic-clock
बर्लिन : जगातील आतापर्यंतचे सर्वांत अचूक घड्याळ जर्मनीमधील तज्ज्ञांनी तयार केले असून आतापर्यंत केवळ संकल्पनेतच असलेली अचूक वेळ या संशोधकांनी तयार केलेल्या नव्या अणुघड्याळाने (अ‍ॅटॉमिक क्लॉक) प्रत्यक्ष साधली आहे. येथील पीटीबी या संस्थेतील भौतिकशास्त्रज्ञांनी या ऑप्टिकल सिंगल आयन घड्याळाची निर्मिती केली आहे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रॅपमध्ये भारित कणांच्या मदतीने असे अचूक घड्याळ तयार करता येईल, ही कल्पना १९८१ मध्ये हान्स डेमेल्ट या संशोधकाने मांडली होती. या संशोधकाला नंतर नोबेल पारितोषिकही मिळाले. भारित कणांचा वापर करून असे घड्याळ तयार केल्यास त्याद्वारे अविश्वसनीय अचूकता मिळू शकते, असे डेमेल्ट यांनी सांगितले होते.

त्यांच्या या गृहीतकाच्या आधारावर आतापर्यंत संशोधकांच्या अनेक गटांनी हे घड्याळ तयार करण्याचा प्रयत्न केला. यासाठी काहींनी एका भारित कणाचा वापर केला, तर काहींनी अनेक कोणताही भार नसलेल्या कणांचा वापर केला. अखेर पीटीबीच्या संशोधकांनी एका भारित कणाचा वापर करून हे घड्याळ तयार करण्यात यश मिळविले आहे. सध्या वापरात असलेल्या घड्याळांची वेळ सेसियम अणुघड्याळावर आधारित असते. म्हणजेच, त्याचा लंबक लघुतरंगांच्या (मायक्रोवेव्ह) कंपनाने हालतो. अचूकतेच्या व्याख्येनुसार, हे पूर्णपणे अचूक नव्हते. त्यात वारंवार सुधारणा करावी लागून वेळ सुधारुन घ्यावी लागत होती. त्यामुळेच ऑप्टिकल अणुघड्याळाची गरज व्यक्त होती.

संशोधकांनी तयार केलेले हे घड्याळ सध्या वापरात असलेल्या घड्याळाच्या शंभरपट अधिक अचूक आहे.हे घड्याळ तयार करण्यासाठी इटरबियम कणांचा (धल) वापर केला गेला. हे कण एका सेकंदाला शेकडो अब्ज वेळा आंदोलन करतात. यामुळे निर्माण होणा-या कंपनाच्या आधारावर हे घड्याळ काम करते. हे कण लेझर किरणांमध्ये अडकवून त्यांची प्रतिसेकंद आंदोलने मोजली जातात. काही अब्ज वर्षे झाली तरी या घड्याळात चूक होत नाही, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

Leave a Comment