सोन्याला पुन्हा आली झळाळी

gold
मुंबई : सोन्याच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने आणि भारतीय बाजारपेठेतही दागिण्यांची खरेदी वाढल्यामुळे वाढ झाली आहे. सोने १८ महिन्यांनंतर प्रथम उच्चांकी पातळीवर पोहचले आहे. नवी दिल्ली आणि मुंबईत सोन्याचा प्रतितोळा भाव २८ हजार ८०० रुपये इतका होता. जागतिक शेअर बाजारात चिंता असल्याने व क्रूड तेलाच्या किंमती सातत्याने घसरत असल्याने गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र आता लग्नसराई जवळ येत असल्यामुळे सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र चांदीच्या भावात कोणतीही वाढ नसून चांदीचे भाव प्रतिकिलो १३० रुपयांनी खाली आले. चांदीचे प्रतिकिलो दर ३७ हजार १०० रुपये इतके आहेत. शेअर बाजार घसरले की गुंतवणूकदार सोन्याची खरेदी करतात. हा जगभर ट्रेंड चालतो आहे. जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली असून त्यामुळे तेजी वाढली आहे. भारतात घरगुती वापराच्या दागिण्यांची मागणी वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने आयात शुल्क वाढले आहे. त्याचाही किंमत वाढण्यावर परिणाम झालेला आहे. गेल्या ४० दिवसांत १७ टक्क्यांने वधारला असून सोन्याचा भाव सध्या २९ हजारांच्या घरात पोहचला आहे. १ जानेवारी २०१६ रोजी भारतात सोन्याची किंमत २४ हजार ५०० रुपये इतकी होती.

११ फेब्रुवारी रोजी सोन्याची किंमत २८ हजार ८०० रुपये प्रतितोळा इतकी झाली आहे. १ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या ४० दिवसांच्या दरम्यान अंतर्गत बाजारपेठेत १७ टक्के भाव वधारले आहेत. गेल्या दहा दिवसांत सोने १ हजार ४० रुपयांनी महागले आहे. भारतात ज्या पद्धतीने भाववाढ झाली आहे, त्या तुलनेत जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी दिसून येत नाही. सिंगापूरमध्ये सोन्याचे भाव १.५ टक्के वाढले तेथे १२१४ डॉलर प्रति औंस सोने मिळत आहे.

Leave a Comment