भारताला यूएईकडून मिळणार ५ लाख टन तेल मोफत

oil
भारतात कच्चे तेल साठवणूक करण्यासंदर्भातला यूएई आणि भारत यांच्यातील पहिला समझोता नुकताच झाला असून त्यानुसार यूएई तेलभंडारात साठविलेल्या तेलाच्या २/३ हिस्सा भारताला मोफत देणार आहे. हा हिस्सा साधारण ५ लाख टन इतका असेल असे समजते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले यूएईचे उर्जामंत्री सुहेल मोहम्मद अल मजरोई यांच्याबरोबर या संदर्भात झालेली चर्चा यशस्वी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या कच्च्या तेलाचे दर खूपच कमी झाले आहेत व त्यामुळे यूएईने हे तेल दर सुधारेपर्यंत साठविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात विशाखापट्टणम, कर्नाटकातील पडूर व मंगलोर येथे जमिनीखाली तेल साठवणूक करण्याची व्यवस्था केली आहे. या गोदामात साधारण ५३.३० लाख टन तेल साठविता येणार आहे. या तेलाचा वापर आणीबाणीच्या परिस्थितीत करता येणार आहे. याच गोदामातून आबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी त्यांचे तेल साठवून त्या बदल्यात ५ लाख टन तेल भारताला मोफत देणार आहे. भारतात एकूण इंधन खपाच्या ७९ टक्के तेल आयात केले जाते.

Leave a Comment