भारत-अरब अमिरातीत होणार १६ करार

invest
नवी दिल्ली : येत्या बुधवारी भारत दौ-यावर अबूधाबीचे राजे शेख मोहम्मद बिन झायद अल नाहायन हे येणार असून या वेळी अणुऊर्जा, तेल, माहिती तंत्रज्ञान, अंतरिक्ष, रेल्वे आणि संयुक्त अरब अमिरातद्वारे भारतात काही कोटी डॉलर्सची गुंतवणूक आदी मुद्यांवर सुमारे १६ करार केले जाणार असल्याची शक्यता अधिकृत सूत्राने वर्तविली आहे.

त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी भेटीदरम्यान पुरोगामी तत्त्वप्रणाली अंगिकारणे, दहशतवादावर आळा घालण्याकरिता सहकार्य आणि अत्यंत जहाल असलेल्या इसिसशी लढा देण्याबाबत अबूधाबीचे राजे प्रामुख्याने चर्चा करतील, अशी माहिती संयुक्त अरब अमिरातीचे राजदूत अहमद अल बन्ना यांनी दिली.

सहा महिन्यांपूर्वी संयुक्त अरब अमिरातला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली होती. त्यानंतर आता होणा-या तीन दिवसांच्या भेटी अंतर्गत मुख्यत्वाने गुंतवणुकीचा विषय हाताळला जाणार आहे. अमिरातची राजधानी अबूधाबीकडे तब्बल ८०० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका सार्वभौम संपत्ती निधी आहे त्यामुळे भारतामध्ये अबूधाबीने गुंतवणूक केल्यास भारताकरिता ते अत्यंत फायदेशीर ठरेल. त्या दृष्टीने काही घोषणा या भेटीदरम्यान होण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.

Leave a Comment