आता हफ्त्यावर मिळणार कर्करोगाची औषधे

glenmark
नवी दिल्ली – कर्करोगाने झुंज देत असलेल्या रुग्णांसाठी ग्लेनमार्क या औषध कंपनीने नवी योजना आणली असून आता महागड्या औषधांचे मूल्य या योजनेद्वारे हफ्त्यांद्वारे चुकवता येणे शक्य होईल.

सुरुवातीला प्रोस्टेट कर्करोगाकरिता असलेले एबिराप्रो आणि अन्य प्रकारच्या कर्करोगांकरिता एवरमिल या दोन औषधांचा या योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. सध्या, २५० मिलीग्रॅमच्या १२० गोळ्या असलेल्या एका एबिराप्रो स्ट्रिपची किंमत तब्बल ३९ हजार ९९० रुपये इतकी आहे. तर त्याशिवाय ६० गोळ्यांच्या एका पॅकची किंमत १९,९९५ रुपये आणि ३० गोळ्यांच्या पॅकची किंमत ९,९९८ रुपये आहे. याशिवाय एवरमिलच्या १० मिलीग्रॅमच्या १० गोळ्यांच्या एका पॅकरिता रुग्णाला २९,९६५ रुपये मोजावे लागतात. पाच मिलीग्रॅमच्या १० गोळ्यांच्या एका पॅककरिता १९,९०० रुपये आकारले जातात.

याबाबत माहिती देताना कंपनीचे अध्यक्ष आणि भारतातील उद्योगाचे प्रमुख सुजेश वासुदेवन यांनी सांगितले की, महागड्या औषधांमुळे अनेक रुग्णांना पूर्ण उपचार घेणे शक्य होत नसल्यामुळे कित्येकजण अर्ध्यावरच उपचार घेणे थांबवित असल्यामुळे ही योजना आम्ही लागू केली. एबिराप्रो और एवरमिल ही औषधे काही महिने ते काही वर्षांपर्यंत रुग्णाला घ्यावी लागतात. ही दोन्हीही औषधे रुग्णांच्या आयुष्याकरिता अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळेच ही योजना बंगळुरू, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, कोचीन, कोलकाता, चेन्नई, इंदूर, जयपूर, नवी दिल्ली आणि चंदीगड या १२ शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment