फूड ट्रक्स् – फिरती उपाहार गृहे

food
बंगळुरु शहरामध्ये आणि विशेषतः या शहराच्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये एक फेरफटका मारला तर आपल्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागांवर एका विशिष्ट रंगाच्या आणि ढंगाच्या छोट्या मालमोटारी उभ्या असलेल्या दिसतात. गेल्या तीन वर्षांमध्ये या शहरात मोठ्या वेगाने वाढलेला हा व्यवसाय आहे. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे या मालमोटारीतून हॉटेले लोकांपर्यंत गेलेली आहेत. हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची सवय वाढत चालली आहे. परंतु काही लोकांना हॉटेलपर्यंत जायलासुध्दा वेळ नाही. त्यामुळे काही तरुणांनी ही गरज ओळखून हॉटेलच लोकांपर्यंत आणले आहे. या हॉटेलांना फूड ट्रक्स् असे म्हणतात. अमेरिकेतील काही शहरात अशा प्रकारचा व्यवसाय गतीने वाढला आहे. त्याचेच अनुकरण करत बंगळुरमधल्या काही तरुणांनी फूड ट्रक्सची सुरूवात केली आहे.

काही तरुणांनी मालमोटारीचा वापर करण्याऐवजी लहान मोटारकारचा वापर केला आहे आणि या कारमध्येच खाद्यपदार्थ तयार करण्याची व्यवस्था केली. कारचे मागचे दार उघडले की तिथून ग्राहकांना खाद्यपदार्थ देता येतात. खाद्यपदार्थांमध्येसुध्दा केवळ फास्ट फूड देण्याची सोय आहे. अब्दुल कादीर या २५ वर्षीय वयाच्या तरुणाने हा उपक्रम बंगळुरमध्ये सुरूवातीलाच केला. त्याच्या फूड ट्रकचे नाव आहे या हबीबी. २००८ च्या सुमारास जागतिक मंदीमुळे त्याची नोकरी गेली आणि त्याने असे फिरते हॉटेल सुरू केले. सुरूवातीला या हॉटेलमध्ये चहा, सँडविच आणि बर्गर दिले जात होते. मात्र मागणी वाढत गेली आणि आता त्याच्या या हबीबीमध्ये बर्गरबरोबरच पिझ्झा, हॉट डॉग, पास्ता, फ्रेंच फ्राईज आणि काही मांसाहारी फास्ट फूडही दिले जाते.

या खाद्यपदार्थांचा दर तुलनेने कमी आहे. तिथे बर्गर १२० रुपयांना मिळतो आणि ते लोकांसाठी आकर्षण आहे. अब्दुल कादीर याच्यापाठोपाठ चौघांनी आणखीन एक फूड ट्रक सुरू केला. त्यामध्ये सुदर्शन एम.एस., शकील अहमद, फ्रान्सीस झेवियर आणि चंद्रमोहन हे भागीदार आहेत. हे सगळे विशीतले तरुण आहेत. संध्याकाळी केवळ चार तास हा व्यवसाय करतात आणि दररोजची त्यांची कमाई १० हजार रुपये आहे. या सगळ्यांना मिळालेले यश बघून विवेक कार्नालियो आणि जिम्सन जॉन्स या दोघांनीही स्वॅट फूड हे रेस्टॉरंट सुरू केले. त्यांच्या बर्गरना तर लोकांची फार मागणी आहे. आता श्रेया बी या अवघ्या २४ वर्षाच्या तरुणाने आणखी एक फूड ट्रक सुरू केलेला आहे.

बंगळुरच्या काही भागांमध्ये जिप्सी किचन, स्पिट फायर बीबीक्यू अशा काही फूड ट्रक लोकप्रिय झालेल्या आहेत. सिध्दांत सावकार आणि प्रतिका बिनानी यांच्या मालकीच्या या ट्रक आहेत. शक्ती सुब्बाराव याने खरे म्हणजे गोव्यात जाऊन एक हॉटेल सुरू करण्याचा विचार केला होता. परंतु तो विचार रद्द करून फूड ट्रक सुरू केला आणि आपल्याला आता गोव्यात जाऊन काही व्यवसाय करण्याची गरज नाही हे त्याच्या लक्षात आले.

या व्यवसायामधून विशिष्ट प्रकारची वाहने तयार करण्याची गरज निर्माण झाली आणि त्यातून आता फूड ट्रक्स करण्याचा व्यवसायसुध्दा पुढे आला. त्याही व्यवसायात काही मुलांनी लक्ष घातले आणि बघता बघता त्यांच्या या फूड ट्रक्सना हैदराबाद आणि दिल्ली या शहरांमधून मागणी यायला लागली आहे. येत्या काही दिवसात फूड ट्रक चालवण्यापेक्षा वाहने तयार करून विकण्याचा व्यवसायच जोरात सुरू होईल आणि बंगळुरच्या पाठोपाठ पुणे, मुंबई, चेन्नई, चंदिगढ, इंदौर, लखनौ याही शहरात रस्त्याच्या कडेला संध्याकाळचे चार घंटे अनेक फूड ट्रक सुरू झालेले दिसतील. उत्साही आणि हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणांना ही एक उत्तम उद्योगसंधी आहे.

Leave a Comment