१०,००० कर्मचा-यांची ‘शेल’ करणार कपात

shell
अ‍ॅमस्टरडॅम : तिमाही निकाल जाहीर करत १०,००० कर्मचा-यांची कपात करण्याची घोषणा रॉयल डच शेल कंपनीने केली आहे. केवळ ३.८ अब्ज डॉलरचा शेलला संपुर्ण वर्षात नफा झाला आहे. मागील वर्षी (२०१५) कंपनीने तब्बल १९ अब्ज डॉलर नफा मिळवला होता. कंपनीच्या वार्षिक नफ्यात गेल्या तेरा वर्षात प्रथमच एवढी तीव्र घसरण झाली आहे. या घोषणेनंतर कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वधारला होता.

तेलाच्या किंमती गेल्या काही काळात प्रचंड घसरल्या आहेत. अठरा महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भाव १०० डॉलर प्रति बॅरल होता. आता हा दर अवघ्या ३० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्यामुळे अनेक कंपन्यांनी गुंतवणूक कमी करत नोक-यांमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. शेल ही जगातील सर्वांत मोठी ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी खनिज तेलाचे उप्तादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेटड्ढोल आदी इंधनांचे वितरण अशा सर्व क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या वर्षी ‘बीजी ग्रुप’ चे अधिग्रहण करतानाचा शेलने २०१५ वर्षात नफ्यावर परिणाम होण्याचा इशारा दिला होता. या अधिग्रहणामुळे हजारो कर्मचा-यांची कपात केली जाणार आहे. जगातील सर्वांत मोठ्या तेल कंपन्यांमध्ये एका दशकानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. ‘आम्ही कंपनीत महत्त्वाचे बदल करण्याचे निश्चित केले आहे.

कच्चया तेलाच्या घसरत्या किंमतीना प्रतिसाद देत आम्ही कंपनीची पुनर्रचना करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आधी सूचित केल्याप्रमाणे सुमारे १०,००० कर्मचा-यांची कपात केली जाईल. तसेच थेट कंत्राटावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेन व्हान बेर्देन यांनी सांगितले. तसेच बीजी ग्र्रुपचे अधिग्रहण हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून भागधारकांना मिळणारा परतावादेखील वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. बीजी ग्रुपचे अधिग्रहण केल्यापासून तेलाच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

त्यामुळे काही भागधारक आता या कराराला विरोध करताना दिसत आहेत. कंपनीने गेल्यावर्षी एकूण खर्चात चार अब्ज डॉलरची कपात केली आहे. यावर्षी कंपनी आणखी तीन अब्ज डॉलरची कपात करणार आहे. शिवाय, कंपनीने वर्षभरात भांडवली खर्चाचा आकडा २८.९ अब्ज डॉलरवरून ८.४ अब्ज डॉलरवर आणला आहे. अनेक मालमत्तांची विक्री केली असून आणखी ३० अब्ज डॉलरची मालमत्ता विकण्याचे निश्चित केले आहे.

Leave a Comment