तीन नव्या रूपात प्रसिद्ध बार्बी डॉल

barbie-doll
न्यूयॉर्क : जगातील सर्वांत प्रसिद्ध बार्बी डॉल सर्वांना माहिती आहेच. तीही काळानुरूप बदलत गेली, नव्या पिढीतही तिची लोकप्रियता कायम राहिली, आता तिची तीन नवी रूपे पुढे येत आहेत. त्यात ठेंगणी-ठुसकी, उंचीपुरी व घाटदार अशा तीन शरीररचना प्रकारात ती सामोरी येत आहे. बार्बी बाहुलीच्या जन्मानंतर सत्तावन्न वर्षांनी हे आणखी बदल होत आहेत.

नाजूक कंबर असलेली निळ्या डोळ्यांची बार्बी कॅलिफोश्नयातील मॅटेल या खेळणीउत्पादक कंपनीने बनवली. आता तीन नव्या रूपात सामोरी येत आहे, नव्या व बदलत्या जगाचे प्रतिबिंब त्यात आहे. मुलांचे आईवडील व स्त्रीवादी संघटनांनी बार्बीच्या मूळ आकारावर अनेकदा टीका केली होती. तिची शरीररचना ही मुलींच्या शरीररचनेशी तुलना करता अवास्तव आहे, असेच अनेक सुधारणांनंतरही लोकांचे म्हणणे होते.आता नवीन बार्बी बाहुल्यांमध्ये त्वचेचे रंग वेगळे आहेत, डोळ्याचे बावीस रंग आहेत तर केशरचनेच्या २४ शैली आहेत, नवीन कपडे व इतर साधने तर आहेतच. शॉप डॉट मॉटेल डॉट ओआरजी या संकेतस्थळावर या नव्या बाहुल्या मिळतील.

बार्बी उत्पादनाच्या जागतिक महाव्यवस्थापक व उपाध्यक्ष एव्हलिन मॅझोके यांनी सांगितले, की बार्बीचे बदललेले रूपडे पाहून आम्ही उत्साहित आहोत. जगातील मुलींच्या प्रतिमेचे प्रतिबिंब त्यात आहे, त्यांचे आकार, त्वचेचा रंग व शैली वेगळे आहे, त्यामुळे मुली या बाहुल्यांशी समरस होतील यात शंका नाही. मुली व त्यांचे आई वडील यांच्याशी आमचे उत्तरदायित्व आहे, सौंदर्याचा एक विस्तीर्ण अवकाश यात साधलेला आहे. घाटदार बार्बीचे नितंब मोठे आहेत, मांड्या जाड आहेत व पोट गोलाकार आहे.

आता ती टाइम नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर अवतरली असून ‘नाऊ कॅन वुई स्टॉप टॉकिंग अबाउट माय बॉडी’ असा प्रश्प विचारत आहे. झेब्रा पट्ट्यांचा स्वीम सूट घातलेल्या मृगनयनी बार्बी डॉलची पहिली निर्मिती १९५९ मध्ये मॅटेल लाइनने केली होती. बार्बी बाहुल्यांचा खप जगात दोन वर्षांमध्ये कमी झाला होता. मुली इतर बाहुल्यांकडे, इलेक्टड्ढॉनिक खेळणी व टॅबलेटकडे आकर्षित होत होत्या. त्यामुळे बार्बी बाहुल्या आता नवा साज घेऊन आल्या आहेत. जगातील पॉप कल्चर म्हणजे लोकप्रिय संस्कृतीचे प्रतीक म्हणून बार्बी बाहुल्यांनी नाव कमावले, बार्बी बाहुली शिक्षक, अवकाशवीर, अमेरिकेची अध्यक्ष अशा अनेक रूपात यापूर्वी सामोरी आली व १९६० मध्ये तिने आफ्रिकन-अमेरिकन व इतर वांशिक रूपे परिधान केली.

Leave a Comment