अनाथाश्रमापासून अमेरिकेपर्यंत……

anil-jyoti-reddy
तिची कहाणीच एवढी प्रेरणादायी आहे की, ती ज्या परिसरात अनाथाश्रमात राहून शिक्षण घेत होती त्या आंध्र प्रदेेशातल्या काकतीय विद्यापीठाने बी. ए. च्या क्रमिक पुस्तकात तिचा धडा समाविष्ट केला आहे. हा धडा घेतला गेला त्याच्या केवळ दहाच वर्षे आधी ती याच विद्यापीठाकडे तृतीय श्रेणीची नोकरी मागत होती. कारण ती नोकरी मिळाली तरच तिची आणि तिच्या कुटुंबाची हातातांेंडाची गाठ पडणार होती. आज ती अमेरिकेत आय. टी. प्रोफेशनल आहे आणि तिच्या दोन्ही मुली तिथेच या व्यवसायात कार्यरत आहेत. घर नसल्यामुळे तिला आंध्र प्रदेशात अनाथाश्रमात रहावे लागले होते पण आता या घडीला अमेरिकेत तिच्या मालकीची सहा घरे आहेत.

एक वेळ अशी होती की, तिला दोनच साड्या होत्या. तिसरी साडी ही तिच्यासाठी चैन होती. पण तिने मोठ्या कष्टाने तिसरी साडी खरेदी केली होती. ती होती १३५ रुपयांची. आता तिला साड्यांना तोटा नाहीच पण तिने आपल्या दुसर्‍या मुलीच्या विवाहात नेसण्यासाठी खास साडी खरेदी केली ती होती एक लाख रुपयांची.

सारी कहाणीच विलक्षण आहे. डॉ. अनिला ज्योती रेड्डी. आपल्या गरीब वडलांची दुसर्‍या क्रमांकाची मुलगी. तिला तीन बहिणी आहेत. चार मुली होत्या पण खायचे वांधे होते. म्हणून तिच्या वडलांनी या मुलींना आई नाही असे खोटेच सांगून त्यांना अनाथाश्रमात ठेवले होती. अनिला ज्योती रेड्डी पाचवी ते दहावी अशी सहा वर्षे अनाथाश्रमात राहून शिकली. दहावीत असताना रेक्टरची परवानगी न घेता सिनेमाला गेली आणि तिला शिक्षा झाली. पण तिला शिक्षेची पर्वा होती कोठे ? ती त्या सिनेमातल्या नायिकेप्रमाणे प्रेम विवाह करण्याच्या कल्पनेने पुरती पेटलेली होती. तिचे हे थेर पाहून तिच्या वडलांनी तिला अनाथाश्रमातून काढलेच पण घरी आणून तिचा विवाह २७ वर्षाच्या एका शेतमजुराशी लावून दिला. तेव्हा तिचे वय होते१६ वर्षे.

मनातला राजकुमार मिळवायला ती तडपत होती आणि तिला मिळाला शेतमजूर. त्याने तिला दोन वर्षात दोन मुली दिल्या. ती १८ वर्षांची होती तेव्हा दोन मुलींची आई होती. गरिबी अशी काही पाचवीला पुजलेली की, दोन डबे भरून डाळ घरात असावी हे तिचे मोठे स्वप्न होते. पण ते कसे पूर्ण होणार? घरात नीट खायलाच काही नाही तर आपल्या दोन मुलींचे शिक्षण कसे पूर्ण करणार ? काही धडपड करायला हवी पण घरात एवढी नियंत्रणे होती की, नवर्‍याशिवाय अन्य कोणा पुरुषाशी बोललेलेही चालत नव्हते. काही तरी करण्याची महात्त्वाकांक्षा मात्र होती.

शेवटी मार्ग मिळाला. शेतमजुरांच्या शाळेत इंग्रजी शिकवणारी शिक्षिका म्हणून तिची निवड झाली. पुढे बढती मिळून खेड्यातल्या मुलांना आणि महिलांना शिवण शिकवण्याची संधी मिळाली. आपल्या नावामागे प्राध्यापक ही उपाधी लागावी ही फार इच्छा होती पण त्यासाठी एम. ए करायला हवे. तेही मुक्त विद्यापीठातून केले पण प्राध्यापक होण्यासाठी पीएच डी व्हायला हवे होते ते नंतर कळले आणि तिचे ते स्वप्न भंगले पण दरम्यान तिचा एक़ चुलत भाऊ भेटला जो अमेरिकेत रहात होता. त्याने तिला अमेरिकेत जाण्यास सुचविले. ते ऐकल्यावर तिला हसू आवरेना पण भावाने तिला विश्‍वास दिला. अमेरिकेत जायचे असेल तर संगणकाचा अभ्यासक्रम करायला हवा म्हणून तोही केला आणि गेली अमेरिकेला.

तिथे नोकरी करायला लागली. जीवनाचे चित्र बदलले. काही काळ इंग्रजीची शिक्षिका म्हणून काम केले होते ते आता अमेरिकेत कामाला आले. छान नोकरी मिळाली आणि कुटुंबाला अमेरिकेत नेले. दरवर्षी एकदा आपल्या गावी येते तशी एकदा आली होती. गावातल्या मंदिरात पूजा केली. पूजा केल्यावर पुजार्‍याच्या पाया पडली तेव्हा पुजार्‍याने आशिर्वादपर बोलताना म्हटले, अमेरिकेत नोकरी करण्यापेक्षा काही तरी व्यवसाय करावा. म्हणजे पैसा चांगला मिळतो. आधी त्यावर विश्‍वास बसला नाही पण एकदा तसे धाडस केलेच. नवल म्हणजे धंदाही छान चालायला लागला. आता या आयटी कंपनीची मालमत्ता दीड कोटी रुपयांची आहे. एक काळ असा होता की, दिवसाला पाच रुपये मिळणे मुष्कील होते.

Leave a Comment