‘ऑडी’ने बनविली किल्ल्याप्रमाणे ‘चिरेबंदी’ कार

Audi
नवी दिल्ली: आपल्या छातीचा कोट करून स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या किल्ल्यांचा इतिहास मराठी माणसाचा ऊर भरून आणतो. त्याचप्रमाणे आपल्या मालकाचे गोळीबार, बॉम्बहल्ला, रासायनिक हल्ला यापासून रक्षण करणारी किल्ल्याप्रमाणेच ‘चिरेबंदी’ कार अस्तित्वात आहे; यावर विश्वास बसेल का? राजधानीत सुरू असलेल्या
ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये ही चिरेबंदी कार ‘ऑडी’ने प्रदर्शित केली आहे.

प्रदर्शनातील सगळ्या गाड्या या प्रेक्षकांना सहजपणे पाहता येतील;अशा पद्धतीने मांडलेल्या आहेत. अर्थात प्रदर्शनाचे उद्दिष्टच या गाड्या बघितल्या जाव्या; हेच आहे. मात्र ऑडीची ही गाडी एका बंद केबिनमध्ये ठेवण्यात आली आहे. या केबिनमध्ये सर्वसामान्य प्रेक्षकांना प्रवेश नाही. कारण अर्थातच ही गाडी सामान्यांसाठी नाहीच आहे!

ही गाडी साधी बुलेटप्रूफ गाडी नाही. तिच्यावर बॉम्ब जरी फेकले तरी ती त्या हल्ल्याला दाद देत नाही. तिच्या काचांवरही एके ४७ ने गोळ्यांचा वर्षावर केला तरी तिला साधा ओरखडाही उठत नाही. या गाडीला आगीने वेढले तरी तिला काही होत नाही.गाडीवर रासायनिक हल्ला झाला तरीही त्वरित संपुर आदीच्या भोवती रसायनरोधन फुग्यांचे आवरण तयार होते आणि त्या परिस्थितीतही गाडीच्या आत दहा मिनिटापर्यंत शुद्ध हवेचा पुरवठा होऊ शकतो. गाडीच्या टायरला गोळ्या लागून ते पंक्चर झाले तरी त्या अवस्थेत गाडी ८० किलोमीटर वेगाने धाऊ शकते.

या गाडीला एक ऐवजी ५ बॅटरीज बसविण्यात आल्या आहेत. ही गाडी १ लिटर इंधनात केवळ ९ किलोमीटर जाऊ शकत असली तरी तिची इंधनाची टाकी अवाढव्य म्हणावी अशीच आहे. गाडीच्या एका दरवाजाचे वजन तब्बल १६० किलो आहे. त्यामुळे हे दरवाजे उघडणे हे ताकदीचे काम आहे. गाडीच्या बाहेरून चहूबाजूने हल्ला झाल्यास हे दरवाजे आतून आपोआप लॉकहोतात आणि ते उघडण्यासाठी प्रत्येक दरवाजाला छोटे बॉम्ब बसविले आहेत. त्याचा नियंत्रित स्फोट गाडीच्या आतून केल्यानंतरच दरवाजे उघडू शकतात.

या गाडीची किंमत आहे तब्बल ९ कोटी रुपये आणि कंपनीला या गाडीसाठी ऑर्डर दिल्यानंतर ६ ते ९ महिन्यानंतर ही ‘सिक्युरिटी कार’ दिमतीला हजर होऊ शकेल.

Leave a Comment