एकट्या महिलेसाठी विमान झेपावले आकाशात

china
बीजिंग : अनेकदा पुरेसे प्रवासी नसल्याचे कारण देऊन अनेकदा अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याचा अनुभव आपण अनेकदा घेतो. मात्र यांच्या अगदी उलटा अनुभव चीनमधील एका महिलेला आला. ही महिला एकटीच प्रवासी असूनही तिच्यासाठी चक्क एक विमान आकाशात झेपावले.

चिनी दिनदर्शिकेप्रमाणे नवे वर्ष ८ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. नूतन वर्षी मायदेशी किंवा मूळगावी जाण्याची प्रथा चीनमध्ये पाळली जाते. त्यानुसार झँग ही एका मोटर कंपनीतील महिला कर्मचारी घरी जाण्यासाठी निघाली. मात्र जोरदार हिमवृष्टीमुळे सोमवारी इतर प्रवासी हे विमान गाठू शकले नाहीत. अखेर एका महिलेसाठी हे बोईंग ३७७ विमान दक्षिण चीनच्या गुआंगझाऊ भागातून आकाशात झेपावले.

खराब हवामानामुळे हे विमान १० तासांनी उशीरा सुटणार होते. हिमवृष्टीमुळे रेल्वे प्रमाणेच विमानांच्या उड्डाणाचे वेळापत्रकही कोलमडले. त्यामुळे अनेक प्रवासी विमाने पकडू शकले नाहीत. मात्र वेळेत आलेल्या झँगसाठी चायना एअरलाईन्सने तिच्यासाठी विमान नेण्याचा निर्णय घेतला.

या प्रवासासाठी झँगने १ हजार २०० युआन म्हणजेच अंदाजे १२ हजार ३७० रुपये मोजले. तिने एका विमानात एकटीने केलेला ‘शाही’ चिनी मायक्रोब्लॉगिंग साईटवर वर्णन केला आहे. ‘हा माझ्या आयुष्यातील अत्यंत दुर्मीळ आणि अविस्मरणीय अनुभव आहे. मला एखादा रॉकस्टार असल्यासारखं वाटतं;’ अशी भावना तिने व्यक्त केली.

विमानात एकटीच असल्याने तिला विमानातील कर्मचाऱ्यांकडून ‘विशेष’ वागणूक मिळाली. उड्डाण करण्यापूर्वी वैमानिकानेही तिची भेट घेतली. विमानातील रिकाम्या सीट्सचे तिने घेतलेले फोटो चीनी नेटिझन्सकडून अनेक लाईक्स, शेअर आणि कमेंट्स मिळवून गेले.

Leave a Comment