पहिली ‘झिका’प्रतिबंधक लस भारतात विकसित

Zika

हैदराबाद: सध्या जगातील सर्वात भयानक साथीचा रोग बनलेल्या ‘झिका’चा प्रतिबंध करणारी जगातील पहिली लस विकसित करण्यात आल्याचा दावा येथील ‘भारत बायोटेक इंटरनॅशनल’ या कंपनीने केला आहे. या लसीच्या पेटंटसाठी कंपनीने अर्ज दाखल केला आहे.

नवजात अर्भकांच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या ‘झिका’च्या साथीने जगभरातील २० देशात थैमान घातले असून त्यामध्ये ब्राझीलसह लॅटिन अमेरिकेतील २० देशांचा समावेश आहे. प्रामुख्याने या रोगाच्या विषाणूचा प्रसार डास चावल्यामुळे होत असला तरी शारीरिक संबंधातून या रोगाची लागण झाल्याची दुर्मीळ घटना टेक्सास येथे उघडकीला आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक लस विकसित झाल्याचे वृत्त दिलासादायक ठरणार आहे.

अधिकृतपणे आयात केलेल्या ‘झिका’च्या जिवंत विषाणूचा वापर करून त्यापासून ही लास विकसित करण्यात आल्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितले. त्याच्या प्राणी आणि मानवावर चाचण्या सुरू आहेत. मात्र ‘मेक इन इंडिया’चे उत्तम उदाहरण असलेल्या या लसीच्या उत्पादनाबाबत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून ‘लाल फितीचा’ विळखा आड येऊ दिला नाही आणि आवश्यक त्या परवानग्या दिल्या तर चार महिन्यात या ‘झिका’वरील लाखो लसींचे उत्पादन करू शकतो; असा दावा त्यांनी केला.

या लसीच्या वैद्यकीयदृष्ट्या काटेकोर चाचण्या घेऊन या लसीच्या उत्पादनात आपण सहकार्य करण्याची भूमिका घेऊ; असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment