जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचा मान गुगलच्या ‘अल्फाबेट’ला!

google
सॅनफ्रान्सिस्को – गुगलच्या छत्राखालील अल्फाबेट या कंपनीने अ‍ॅपलचा जगातील सर्वात मौल्यवान कंपनी हा मान हिरावून घेतला असून अल्फाबेटच्या शेअर्सचे मूल्य हे जास्त असल्याने या कंपनीची आर्थिक ताकद वाढली आहे.

व्यापार घडामोडींशी निगडित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५३०.१ अब्ज डॉलर्स इतके अल्फाबेटच्या शेअर्सचे एकूण बाजार मूल्य आहे तर अ‍ॅपलच्या शेअर्सचे एकूण बाजार मूल्य ५३४.७ अब्ज डॉलर्स आहे. अल्फाबेटच्या शेअर्सचे मूल्य हे प्रत्येकी ७९१ डॉलर्स आहे. नॅसडॅक या न्यूयॉर्कमधील शेअर बाजारातील तिची आगेकूच कायम राहिली तर अल्फाबेट बाजारमूल्याच्या दृष्टिकोनातून अ‍ॅपलला खऱ्या अर्थाने मागे टाकेल.

अल्फाबेटला तिमाहीत पाच टक्के जास्त नफा झाला असून ऑनलाइन जाहिरातीतून त्यांना ४.९२ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत. सुटीच्या काळात इंटरनेटवर जे सर्च झाले आहे, त्यातून त्यांना हा महसूल मिळाला. शॉपिंग मोमेंटचे रूपांतर आता शॉपिंग मॅरॅथॉनमध्ये झाले आहे, असे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले. गुगलचा जाहिरातींचा महसूल वाढत असून तो मोबाइल व डेस्क टॉपवरील सर्चचा परिणाम आहे, असे अल्फाबेटचे मुख्य वित्त अधिकारी रूथ पॉरट यांनी सांगितले.

गेल्या वर्षी शेवटच्या तीन महिन्यांत २१.३ अब्ज डॉलर्सचा महसूल कमावून गुगलने मोठी कामगिरी केली होती. चौथ्या तिमाहीत मोबाइलवर जाहिरातींचे सर्च, यू-टय़ूब जाहिराती यावर कंपनीने बाजी मारली आहे. यू-टय़ूबवर लाखो लोक तासनतास व्हिडिओ बघतात त्याचा फायदा गुगलला झाला आहे. अल्फाबेट कंपनी गुंतवणूकदारांसाठी कारभारात अधिक पारदर्शकता आणणार आहे. कारण गुगल आतबट्टय़ाच्या प्रकल्पात गुंतवणूक करीत असल्याची गुंतवणूकदारांना भीती आहे.

Leave a Comment