नागपूरच्या कार्गोहबमध्ये हेलिकॉप्टरची निर्मिती – मुख्यमंत्री

cm
मुंबई – लवकरच राज्याचे नवे उद्योग धोरण जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण असून सध्या सर्वाधिक औद्योगिक गुंतवणुकीचे प्रस्ताव आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंपोर्ट एक्सपोर्ट बँक ऑफ युनायटेड स्टेटचे (यूएस एक्झिम) अध्यक्ष प्रेड हॉचबर्ग यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हॉचबर्ग यांना महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि उद्योगांच्या संधी तसेच मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन द्रुतगती महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ट्रान्सहार्बर सी लिंक, मिहान प्रकल्प आदींची माहिती दिली.

देशाच्या विकासदरापेक्षा महाराष्ट्राचा विकास दर हा जास्त आहे. गुंतवणूकदारांनी मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांच्या व्यतिरिक्त राज्याच्या अन्य भागात गुतंवणूक करावी अशी आमची अपेक्षा आहे. नागपुरातील कार्गोहबमध्ये रिलायन्स कंपनी संरक्षण विभागासाठी हेलिकॉप्टरचे उत्पादन करणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. प्रेड हॉचबर्ग यांनी यावेळी महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुकता दाखवली. तसेच महाराष्ट्रातील कोणत्या भागात गुंतवणूक करता येईल, याची माहिती हॉचबर्ग यांनी घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. प्रवीणसिंह परदेशी, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव सुमित मल्लिक, अमेरिकेचे भारतातील महावाणिज्य दूत थॉमस वायडा, यूएस एक्झिम बँकेचे जागतिक व्यापार विकास विभागाचे उपाध्यक्ष रे इलिस, बँकेचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ मॅथ्यू बेवेन आदी उपस्थित होते.

Leave a Comment