अन्नाची वासना टाळण्यासाठी…

food
आपल्या आरोग्याचे बरेच प्रश्‍न हे चुकीच्या आहारातून निर्माण होत असतात. अन्न हे शरीरासाठी आवश्यक असतेच परंतु ते विचारपूर्वक खाल्ले नाही तर तेच विष होते. म्हणूनच रामदास स्वामींनी, अन्न तारी अन्न मारी | अन्न नाना विकारी ॥असे म्हटले आहे. म्हणजे अन्न माणसाला तारते पण तेच अन्न माणसाला मारतेसुध्दा. अन्नातूनच नाना प्रकारचे विकारही उद्भवत असतात. म्हणून काही विशिष्ट आजार बळावल्यानंतर काही अन्न पदार्थ वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जात असतो. मधूमेह झालेल्या व्यक्तीला कोणतेही जड अन्न आणि साखर वर्ज्य केली जाते.

वर्ज्य करण्यात आलेल्या अन्नाचे एक वैशिष्ट्य असे असते की जे अन्न नेमके वर्ज्य म्हणून सांगितले जाते तेच अन्न आपल्या समोर येते आणि विशेष म्हणजे जे अन्न आपल्याला वर्ज्य आहे तेच अधिक खावेसेही वाटते. आपल्याला जे वर्ज्य आहे तेच खाण्याची तीव्र इच्छा होण्याला तसेच तेच अन्न नेमके खाण्याला आयुर्वेदामध्ये प्रज्ञापराध असे म्हटले जाते. म्हणजे जाणीवपूर्वक केलेला अपराध. जाणूनबजून केलेले चुकीचे कृत्य.

अशा अन्नाच्या या परिस्थितीवर नेमके उपाय काय? यावर खरे म्हणजे मानसिक उपाय आहेत. मनाचा दृढनिर्धार हा एक चांगला उपाय सांगितला जात असला तरी तो फार अवघड आहे. कारण मनाचा तसा निर्धार असता तर आपण आजारी कशाला पडलो असतो. म्हणून न खाण्याचा दृढनिर्धार आणि भरपूर खाण्याचा हावरेपणा या दोन्हींच्या मधला मार्ग अवलंबवावा असे तज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजेच जी वस्तू खायची नाही पण समोर आली आहे आणि खाण्याची इच्छाही झालेली आहे ती थोडीशी खावून टाकावी मात्र थोडीशी खाल्ल्यानंतर तिला हात लावू नये.

आवडीची खाद्यवस्तू खाल्ली की मन संतुष्ट होते आणि पोट भरल्याची भावना होते. म्हणून तो अन्नपदार्थ थोडासा खावून वर भरपूर पाणी प्यावे म्हणजे थोड्याशा अन्नानंतरचे काही घास खाण्याचा मोह होत नाही. पोट भरल्यासारखे वाटते. कोणतीही वस्तू खाण्याचा मोह हा तसा तात्पुरताच असतो. एकदा खाण्याची इच्छा झाल्यानंतरची १५-२० मिनिटे पुन्हा खाण्याचा मोह होत नाही.

आरोग्य सदरातील माहिती जगभरातील विविध ठिकाणी प्रसिद्ध होणाऱ्या वैद्यकीय संशोधनात्मक निबंध आणि लेखातून घेतली जाते. या संशोधनाची खातरजमा करून घेणे ‘माझा पेपर’ला शक्य नाही आणि ती या माध्यमाची कार्यकक्षाही नाही. त्यामुळे या लेखातील माहितीचा, उपचारपद्धतीचा प्रत्यक्ष वापर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. या सदरातील माहितीची प्रत्यक्ष खातरजमा न करता त्याचा प्रयोग केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला ‘माझा पेपर’ जबाबदार राहणार नाही; याची कृपया नोंद घ्यावी.