मजुराच्या बँक खात्यावर जमा झाले तब्बल १ कोटी

note
लुधियाना : स्वत:चे व कुटुंबातील सदस्यांचे पोट रोजंदारी करून भरणा-या एका गरीब कामगाराला आपले बँक खाते आहे आणि त्यात एक कोटी रुपये आहेत, याची जराही कल्पना नव्हती. जेव्हा त्याच्या निदर्शनात ही बाब आयकर खात्याने आणून दिली आणि आयकरापोटी ४० लाख रुपये भरण्यास सांगितले, त्यालाही तेव्हा धक्काच बसला.

पंजाबच्या फिरोजपूर येथे राहणा-या या कामगाराला खात्यात जमा असलेल्या एक कोटी रुपयांवर ४० लाख रुपये आयकर भरण्यास आयकर खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. ते ऐकून हा कामगार मात्र अवाक् झाला. आयकर अधिका-यांना त्याने स्पष्टच सांगितले की, मी आयुष्यात कधीच बँक खाते उघडले नसल्यामुळे त्यात एक कोटी रुपये जमा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचे उत्तर ऐकून आयकर अधिका-यांनाही धक्का बसला.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काळा पैसा विदेशात पाठविण्याचे सर्वच मार्ग बंद केल्यामुळे अनेकांनी आपला काळा पैसा लपविण्यासाठी गरीब लोकांच्या नावांची आणि त्यांच्या वास्तव्याची माहिती प्राप्त करणे सुरू केले आहे. त्यानंतर त्यांच्या नकळत त्यांच्या नावाने बँकेत खाते उघडून, त्यात कोट्यवधी रुपये जमा केले जात आहेत. त्यातलाच हा एक प्रकार असण्याची शक्यता एका अधिका-याने व्यक्त केली.दरम्यान, अन्य एका घटनेत अमृतसरमधील जिमखान्याची मालक असलेल्या एका महिलेच्या छायाचित्राचा वापर करून अज्ञात लोकांनी तिचे बँकेत खाते उघडले आणि त्यात ५० लाख रुपये जमा केले.

आपले हे खाते कुणी उघडले आणि त्यात पैसा कुठून आला, याविषयी तिला किंवा तिच्या पतीलाही कल्पना नव्हती. तर, खन्ना येथील एका व्यावसायिकाच्या खात्यात त्याच बँकेतील एका खात्यातून १.८२ कोटी रुपये जमा झाल्यानंतर त्याने लगेच याबाबतची माहिती बँक अधिका-यांना दिली होती.

Leave a Comment