चक्क प्रकाशवेगाने वापरता येईल इंटरनेट सेवा !

internet
लंडन : लवकरच नवी क्रांती इंटरनेटच्या विश्वात येऊ घातली असून इंटरनेटवरील माहितीची देवाणघेवाण प्रथमच प्रकाशाच्या वेगाने अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानामुळे करता येऊ शकेल. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले व‘प्रोग्रॅम’ करता येऊ शकेल. सध्याचा इंटरनेट पायाभूत आराखडा भौतिक स्वरूप आणि नेटवर्क लेअर कार्यप्रणाली, प्रोटोकॉल्स आणि सेवांमध्ये स्वतंत्रपणे विकास आणि नवकल्पनांना साहाय्यभूत ठरत नाही.

दरम्यान याच वेळी वेगाने बदलत्या अ‍ॅप्लिकेशन्ससाठी बँडविड्थ वाढविण्याच्या मागणीलाही तो पूरक नसतो. त्यावर उपाय म्हणून संशोधकांनी दोन नव्या क्रांतिकारक कल्पना मांडल्या आहेत. त्यात ऑप्टिकल व्हाईट बॉक्सद्वारे ओपन सोर्स ऑप्टिकल इंटरनेट आणि सॉफ्टवेअर आधारित नेटवर्क तंत्रज्ञानांचा समावेश आहे. याबाबतचे संशोधन रॉयल सोसायटीच्या ‘दी जर्नल ऑफ फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शन्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

इंग्लंडमधील ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधक रेजा नेजाबाती यांनी सांगितले की, ही नवीन तंत्रज्ञाने ऑप्टिकल फायबरच्या जाळ्यापासून मुक्ती देईल तसेच पारंपरिक प्रोग्रॅमर्स व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर्सना नवीन प्रकारची इंटरनेट सॉफ्टवेअर्स व अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्याची संधी देईल. जगभरात सातत्याने नवनवीन इंटरनेट तंत्रज्ञानाची निर्मिती होत असते. मात्र त्यापैकी काहीच नावीन्यपूर्ण आणि क्रांतिकारक इंटरनेट अ‍ॅप्लिकेशन्सची रुजुवात करण्यात यशस्वी होतात. यात नव्या शोधामुळे आणखी एक भर पडणार असून नेटसॅव्हींसाठी हे शुभवर्तमान ठरणार आहे.

नेजाबाती यांनी सांगितले की, आम्ही सादर केलेली तंत्रज्ञानाने नवीन इंटरनेट सेवा आणि अ‍ॅप्लिकेशन्स सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त करू शकतात. आधीच्या तंत्रज्ञानाने हे साध्य होऊ शकत नव्हते. नवीन तंत्रज्ञान हे इंटरनेट व्हेंडर्स आणि ऑपरेटर्सकडे एकवटलेल्या एकाधिकारशाहीचे विकेंद्रीकरण करू शकते. सध्या इंटरनेट सेवेच्या पायाभूत आराखड्यावर त्यांची मक्तेदारी आहे. नव्या तंत्रामुळे जास्त वापरकर्ते आणि नवीन सेवा पुरवठादार निर्माण होऊ शकतील.

Leave a Comment