इलेक्ट्रॉनिक कचरा बनणार सोन्याची खाण

Electronic-waste
टोरँटो: जगासमोरील बिकट समस्या बनलेला इलेक्ट्रॉनिक कचरा आता चक्क सोन्याची खाण बनणार आहे. येथे ‘सोन्याची खाण’ हे शब्द प्रतीकात्मक अथवा म्हण म्हणून वापरलेले नाहीत. खरोखरच कॅनडा येथील वैज्ञानिकांच्या गटाने इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून सोने काढण्याची आणि ते ‘रिसायकल’ करण्याची सुलभ आणि स्वस्त प्रक्रीया शोधून काढली आहे. ही प्रक्रीया पर्यावरणाच्या दृष्टीनेही सुरक्षित असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

इलेक्ट्रॉनिक साधनांच्या ‘सर्किट’मध्ये सोन्याचा वापर केलेला असतो. मात्र सोने हा रासायनिक प्रकियांना प्रतिसाद न देणारा धातू आहे. त्यामुळे त्याचे विघटन करणे अत्यंत कठीण असते. त्यामुळे ही प्रक्रीया खर्चिक आणि पर्यावरणाला धोकादायक बनते. खाणीतून सोने काढणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. कारण या प्रक्रियेत सोडीयम सायनाईड या घातक रसायनाचा वापर करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून क्षणार्धात सोन्याचे विघटन करणे आणि ते ‘रिसायकल’ करून पुन्हा वापरात आणण्याची आपण शोधून काढलेली प्रक्रीया अत्यंत सुलभ, कमी खर्चाची आणि पर्यावरणाला कमीत कमी हानिकारक असल्याचा दावा सस्केहाना विद्यापीठातील प्राध्यापक स्टीफन फोली यांनी केला आहे. या संशोधनामुळे सोन्याच्या उद्योगात क्रांतीकारी बदल घडून येतील; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment