अहमदाबादमध्ये देशातील पहिले ‘अंडरवॉटर रेस्टॉरंट

restaurant
अहमदाबाद : रोज नव नवे शोध आजच्या माहिती आणि विज्ञानयुगात लागत आहेत. नाविन्यपूर्ण संकल्पना साकारल्या जात आहेत. अशीच एक अनोखी म्हणजे पाणीखाली उपहारगृह साकारण्याची संकल्पना सत्यात अवतरली असून अशा प्रकारचे देशातील हे पहिलेच उपहारगृह असणार आहे. देशातील पहिले पाण्याखालील उपहारगृह १ फेब्रुवारीपासून खवय्यांसाठी गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरु होत आहे. या उपहारगृहाचे नाव द रिअल पसाइडन असे असून यात ३२ आसनांची येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

जमिनीपासून २० फुट खाली, सभोवताली १,६०,००० लिटर पाणी आणि त्यात ४००० पेक्षा जास्त माशांचे विविध प्रजातीचे प्रकार असणारे देशातील एकमेव पाण्याखाली असेलेले हे उपहारगृह आहे. या विषयी अधिक माहिती देताना या उपहारगृहाचे मालक भारतभाई भट्ट म्हणाले की, वर्षापूर्वी ही संकल्पना माझ्या मनात आली आणि मागील ८-९ महिन्यात या संकल्पनेवर काम केले. त्यानंतर ही संकल्पना सत्यात उतरत आहे. आम्ही ग्राहकांच्या मनोरंजनाकरता ऑर्केस्टड्ढा सादर करणार आहोत. तसेच खाण्याकरता पंजाबी, थाई, चायनिज आणि मेक्सीकन प्रकारचे पदार्थ उपलब्ध करुन देणार आहोत.

या उपहारगृहात जेवणासाठी बसल्यानंतर पाण्यातील मासे तुम्हाला पोहत असलेले दिसणार आहेत. हा नजारा अगदी जवळून तुम्हाला पाहता येणार आहे. आजुबाजूला मासे तरंगताना पाहत जेवण्याचा अनुभव घेता येणार आहे. इतर उपहारगृहामध्ये ज्या प्रमाणे आपण जेवण करतो तसाच अनुभव या पाण्याखालील उपहारगृहात अनुभवायला मिळणार आहे. मात्र फरक एवढाच आहे की, तुमच्या चोहोबाजूंनी पाणीच पाणी असणार आहे.

या उपहारगृहात सर्वांच्या आवडीचे पदार्थ मिळतील याची काळजी घेण्यात आलेली आहे. या ठिकाणी पंजाबी आणि चायनिजसोबतच थाई आणि मेक्सिकन पदार्थ देखील उपलब्ध आहेत. सध्या या उपहारगृहात ३२ च टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय ऑनलाइन बुकिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या उपहारगृहात सध्या ४ हजार रंगी बिरंगी मासे आहेत. हे मासे दोन लाख लिटर पाण्यात ठेवण्यात आलेले आहे. पुढील काळात ६० हजार मासे ठेवण्यात येणार आहेत.

Leave a Comment