‘झिका’ ची २१०० गर्भवतींना लागण

preganacy
बोगोटा : ‘झिका’ या रोगाची कोलंबियातील २१०० गर्भवती महिलांना लागण झाल्याची माहिती कोलंबियातील राष्ट्रीय आरोग्य संस्थेने दिली असून या रोगाची लागण झालेल्या गर्भवती महिलापासून डोके आणि मेंदूचा विकास न झालेल्या बालकांचा जन्म होतो.

उत्तर आणि दक्षिण अमरिकेत गेल्या काही दिवसांपासून झिकाचा वेगाने प्रसार होत आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार सध्या कोलंबियातील २११६ गर्भवती महिलांसह एकूण २०,२९७ नागरिकांना झिकाची लागण झाली आहे. त्याचबरोबर येत्या वर्षभरात अमेरिका खंडातील जवळपास ४० लाख नागरिकांना झिकाची लागण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

ब्राझीलमध्ये झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांपासून असामान्य आकाराचे डोके व मेंदूचा विकास न झालेल्या ४००० बालकांचा जन्म झाला आहे. डासांपासून पसरणा-या झिका विषाणूवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे दक्षिण, उत्तर आणि पश्चिम अमेरिकेत त्याचा वेगाने प्रसार होत आहे.