पढवली पहाडातील देवांची वस्ती

padhavali
मध्यप्रदेशातील पढवली पहाड म्हणजे तेथील कर्दनकाळ डाकूंचे आश्रयस्थान अशी ओळख गेली काही वर्षे निर्माण झाली होंती मात्र आता हेच पहाड देवांची वस्ती म्हणून प्रसिद्धीस आले आहेत. याचे सारे श्रेय वास्तूपुरातत्त्व विभागाचे माजी अधीक्षक के.के. मोहम्मद यांना जाते कारण त्यांनी येथे दडलेल्या प्राचीन मंदिरांचा समूह उत्खनन करून उजेडात आणलाच पण त्या मंदिरांची पुर्नबांधणीही केली आहे. ही सारी मंदिरे भूकंपामुळे गाडली गेली होती. ग्वाल्हेरपासून ५० किमी अंतरावरची ही देखणी मंदिरे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण बनत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार २००४ साली पुरातत्व विभागाचे तत्कालीन अधीक्षक मोहम्मद यांनी प्रथम ही साईट शोधली. त्या काळी तेथे पोहोचणे हेच दुरापास्त बनले होते कारण तेथे डाकू निर्भयसिंग गुर्जर याची टोळी वस्तीला होती. मोहम्मद यांची खुद्द निर्भयसिंगशी गाठ पडली त्यावेळी तो विडी ओढत होता व मोहम्मद यांना हाच डाकू निर्भयसिंग आहे याची कल्पनाही नव्हती. मात्र त्यावेळी त्यांनी प्रसंग ओळखून निर्भयसिंगलाच या कामी मदतीस येण्याचे आवाहन केले. नवव्या ते अकराव्या शतकातील ही ८० मंदिरे मूळ स्वरूपात आणण्यासाठी ८ वर्षे ६० कुशल कारागिरांना परिश्रम केले. सातत्याने काम करून मूळ स्वरूपात उभी राहिलेली देशातील ही पहिलीच प्राचीन साईट आहे.

विशेष म्हणजे हे पुर्ननिर्माणाचे काम सुरू असताना मध्येच निर्भयसिंगचा मृत्यू झाल्याने येथे बेकायदा खाण माफियांचे पेव फुटले व त्यामुळे काम करणे दुरापास्त बनले. तेव्हाही मोहम्मद यांनी सातत्याने सांस्कृतिक विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र अखेर यशोधराराजे सिंदीया यांनी अन्य योजनांसाठीचा निधी इकडे वळवून हे काम पूर्ण करण्यास सहाय्य केले. मोहम्मद यांना या साईटवर अडेंडंट म्हणून एखाद्या शरण आलेल्या डाकूची नेमणूक करावी अशीही इच्छा होती. त्यामुळे पर्यटकांना हा प्राचीन वारसा पाहताना डाकूंनाही भेटावे असा दुहेरी उद्देश साध्य होऊ शकला असता.