आता पैसे करा खाते क्रमांकाशिवाय ट्रान्सफर

payment
नवी दिल्ली : ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने बँकेचे व्यवहार अधिक सोपे करण्यासाठी नवीन तोडगा काढला असून येत्या काही दिवसांमध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ‘युपीआय’ म्हणजे ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ सेवा सुरू करणार असल्यामुळे खाते क्रमांकाशिवाय पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत.

फक्त एका एसएमएसच्या माध्यमातून युपीआय या सेवेमुळे अन्य व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. हा व्यवहार करण्यासाठी ओटीपीची (वन टाईम पासवर्ड) गरज लागणार नाही. आपल्याला ज्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करायचे असतील त्याचा मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक किंवा बँकेत दिलेला ई-मेल आयडी असेल तर पैसे संबधित व्यक्तीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करता येणार आहेत.

वेगवेगळ्य़ा बँकांचे व्यवहार देखील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने तयार केलेल्या ऍपवरून करता येणार आहेत. येत्या एप्रिलपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्य़ा बँकांशी सल्ला मसलत सुरू आहे. आतापर्यंत २५ पेक्षा जास्त बँका ही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी तयार झाल्या आहेत. त्याचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे.

Leave a Comment