दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अॅपलची भारताला पसंती

invest
गेल्या १३ वर्षात प्रथमच अॅपलच्या स्मार्टफोन विक्रीत घट नोंदविली गेली असतानाच अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अॅपलचे भारताला प्राधान्य राहील असे सूचित केले आहे. जागतिक मंदीचे वातावरण, चलनात सातत्याने होत असलेले चढउतार लक्षात घेऊनही भारतात गुंतवणूक करण्यास कंपनी उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

अॅपलच्या आक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचा अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. अॅपलचा जगभरातील खप यंदा प्रथमच कमी दिसत असला तरी आत्ताच्या परिस्थितीत भारतासारख्या नव्या बाजारातील गुंतवणूक दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. भारतात या काळात अॅपलच्या महसूलात ३८ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. विकसनशील देशांत ही वाढ ११ टक्के आहे. मात्र ब्रिक्स देशात भारताचा विकासदर सर्वाधिक आहे आणि भारताची युवा लोकसंख्या, बेस्ट प्रॉडक्ट चॉईस व वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था लक्षात घेऊन भारतीय बाजारात चांगला टक्का मिळविणे अॅपलला शक्य होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.

चीन व अमेरिकेपाठोपाठ भारत तीन नंबरचे स्मार्टफोन मार्केट आहे. भारत सरकार आर्थिक सुधारणांना प्रोत्साहन देत आहे. फोर जी सेवेची सुरवात येथे झाली आहे तसेच टेलिकॉम सेवाही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भारतात अॅपल प्रॉडक्टस युवा पिढीत लोकप्रिय आहेत तर अन्य वयोगटातील नागरिकांनाही त्याचे आकर्षण आहे. अर्थात भारतात किंमती हा संवेदनशील विषय आहे आणि १० हजार रूपयांच्या रेंजमधील स्मार्टफोन्सना येथे सर्वाधिक पसंती आहे हे लक्षात घेऊन अॅपल नवीन आयफोन भारतात पेश करण्याऐवजी सध्या आहे त्या मॉडेल्सच्या किंमती उतरवून जादा फोन विक्रीसाठी प्रयत्नशील राहील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment