गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात डायनासोरचे जीवाश्म

dinasoure
अहमदाबाद : जर्मन पुरातत्त्व वैज्ञानिकांसह दोन भारतीयांनी गुजरातमध्ये केलेल्या उत्खननात डायनासोरचे जीवाश्म सापडले असून हे उत्खनन कच्छ जिल्ह्यात कासदुनगर टेकड्यांच्या परिसरात करण्यात आले असून तेथे सापडलेले जीवाश्म १६ अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. गुजरातमध्ये आणखी १५० भूगर्भीय स्थळे शोधण्यात आली आहेत. जेथे आणखी जीवाश्म सापडू शकतात किंबहुना तेथे प्राचीन अवशेषही मिळण्याची शक्यता आहे.

पुरातत्त्व वैज्ञानिक डी. के. पांडे यांनी सांगितले की, यापूर्वीही अनेकदा गुजरातमध्ये डायनासोरचे जीवाश्म सापडले आहेत. डायनासोर त्यावेळी सागरी किना-याच्या प्रदेशात राहात होते. पंधरा वर्षांपूर्वी नसश्गक तेल व वायू महामंडळाने केलेल्या उत्खननात डायनासोरचे जीवाश्म सापडले होते व आता पुन्हा तसेच जीवाश्म सापडले असून त्यावरून या भागात एकेकाळी डायनासोरचे वास्तव्य होते असे दिसून आले आहे. कच्छ जिल्ह्यात नेमके कुठे असे जीवाश्म सापडू शकतील यावर वैज्ञानिक गेली पंचवीस वर्षे संशोधन करीत आहेत. छोट्या डायनासोरला पंख होते. त्यांच्यापासून उत्क्रांत होत पक्षी तयार झाले असे मानले जाते. यापूर्वी सर्वात जुना पक्षी कावळ्याच्या आकाराचा होता व तो उष्ण रक्ताचा होता असे मानले जाते. त्याचे नाव आर्किओपेटिड्ढक्स असे असून त्याचा काळ १५ कोटी वर्षांपूर्वीचा मानला जातो. वैज्ञानिकांनी यापूर्वी २१ डायनासोर प्रजातींची चयापचय क्रिया कशी होती, यावर संशोधन केले असून त्यात त्यांच्या शरीराचे वस्तुमान प्रमाण मानले आहे.

त्यांच्या मांडीच्या हाडावरून वाढीचा अंदाज घेता आला आहे. झाडांमध्ये जशी खोडात चक्रे असतात त्यांच्यावरून त्यांचे वय काढता येते तसेच डायनासोरच्या हाडातही अशी चक्रे दिसतात त्यावरून त्यांचे वजन, आकार, वय सगळे सांगता येते असे वैज्ञानिकांचे मत आहे. वैज्ञानिकांच्या चमूतील गौरव चौहान यांनी सांगितले की, आम्हाला या ठिकाणाचा अपघातानेच शोध लागला. भूज शहरापासून २५ कि. मी. अंतरावर असलेल्या कासदुनगर येथे आम्हाला हे जीवाश्म सापडले आहेत. ते डायनासोरच्या हाता-पायांचे हाडांपासून बनलेले आहेत. कार्बन डेटिंग तंत्राने ते किती जुने आहेत ते सांगता येईल त्यावर जर्मनीचे फ्रान्झ फरसिच व डॉ. मॅथियस अल्बर्टी काम करीत आहेत. यापूर्वी बालसिनोर या अहमदाबादपासून १०० कि. मी. अंतरावर असलेल्या महिसागर जिल्ह्यातील गावात डायनासोरची अंडी सापडली आहेत. नर्मदेच्या किनारी डायनासोरचे जीवाश्मही सापडले आहेत.

Leave a Comment