भ्रष्टाचारमुक्त कारभारामध्ये सलग दुसऱ्यावर्षी डेन्मार्क अव्वल

transprancy
नवी दिल्ली – सलग दुसऱ्यावर्षी डेन्मार्कने पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारामध्ये पहिला क्रमांक मिळवला असून ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल द्वारा जाहीर केलेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स २०१५ मध्ये डेन्मार्कने १०० पैक ९१ गुण प्राप्त केले. त्याचवेळी उत्तर कोरिया आणि सोमालिया या दोन्ही देशांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले. या दोन्ही देशांना १०० पैकी अवघे आठ गुण मिळवता आले आहेत. या अहवालात भारताने भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या बाबतीत आपल्या प्रतिमेत सुधारणा करीत १६८ देशांच्या यादीत ८५व्या स्थानावरून ७६व्या स्थानावर उडी घेतली आहे.

संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे सार्वजनिक कारभारातील भ्रष्टाचार ही होय. अमेरिका आणि इंग्लंड या दोन्ही देशांच्या पारदर्शक कारभारात सुधारणा झाली असून या दोन्ही देशांना आतापर्यंतचे सर्वात चांगले गुण मिळाले आहेत. अमेरिकेला १०० पैकी ७६ गुण मिळाले असून अमेरिका या यादीमध्ये १६ व्या स्थानावर आहे. तर इंग्लंडला १०० पैकी ८१ गुण मिळाले असून इंग्लंड यादीमध्ये दहावा क्रमांकावर आहे. इंग्लंडसोबत जर्मनीही दहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर फिनलंड, स्वीडन, न्यूझिलंड, नेदरलॅंड्स, नॉर्वे, स्वित्झर्लंड, सिंगापूर आणि कॅनडा यांची अनुक्रमे दुसऱ्या ते नवव्या स्थानावर आहेत. ही यादी सार्वजनिक क्षेत्रातील कारभारबद्दल तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार तयार केली जाते.

Leave a Comment