ऑफिस कामाचा स्टॅमिना टिकवण्यासाठी…

office
सध्याच्या काळात लोकांच्या आहारात बदल झाला आहे. निव्वळ उष्मांकाचा विचार केला तर लोकांच्या खाण्यामध्ये अधिक उष्मांकांचे पदार्थ येत आहेत. मात्र आहार चांगला असूनही हालचालींचा अभाव असल्यामुळे जीवनशैलीशी निगडित असे विकार लोकांना अधिक जडत आहेत. रक्तदाब आणि हृदयविकार त्याचबरोबर मधुमेह अशा विकारांनी बाधित असलेल्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. या विकारांमुळे केवळ त्यांचेच नुकसान होते असे नाही तर देशाचे नुकसान होते. जागतिक आरोग्य संघटनेेने केलेल्या एका पाहणीनुसार भारतातल्या लोकांची या आजारापोटी कमी होणारी कार्यक्षमता भारताचे दरवर्षी २३७ अब्ज डॉलर्स एवढे नुकसान करत असते. त्यामुळे किंवा स्वतःचे आरोग्य चांगले रहावे म्हणून लोकांनी काही साधी पथ्ये पाळण्याची गरज आहे. ती पथ्ये पाळल्यास ऑफिसमध्ये काम करण्याचा स्टॅमिना टिकू शकेल.

आपल्याला कधी कधी एखाद्या ठिकाणी बसून कंटाळा आला की आपण शरीराला आळोखेपिळोखे देऊन आळस देतो. आळस देण्याची एक मूलभूत प्रवृत्ती लोकांत असते. त्यांच्या हातून आळस देण्याची ही क्रिया आपोआप आणि एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून घडते. मात्र स्टॅमिना टिकवण्यासाठी दिवसातून कमीतकमी तीनचार वेळा तरी असा आळस द्यावा. तो जाणीवपूर्वक द्यावा. आळस देण्याच्या बाबतीत आळस करू नये. शिवाय पाणी पिण्याच्याबाबतीही आळस करू नये. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे मात्र जेवताना किंवा जेवल्याबरोबर पाणी पिऊ नये. जेवल्यानंतर किमान तास दीडतास तरी पाणी न पिण्याचे पथ्य पाळावे.

आजकाल मोठ्या इमारतींमध्ये लिफ्ट ही आवश्यकच झालेली आहे. परंतु लिफ्ट असली तरी अधूनमधून स्वतःहून एकदोन मजले तरी पायी चढून उतरावेत. म्हणजेच काही अंतराने का होईना लिफ्ट टाळावी. शिवाय वेळेवर जेवण करावे. शक्यतो घरी तयार केलेले पदार्थ बॅगमध्ये ठेवावेत आणि भूक लागताच ते घरचे पदार्थच खावेत. अन्यथा भूक लागूनसुध्दा पटकन काही खाल्ले नाही तर कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment