डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान


भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्याच सुमारास भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरणा घेऊन आशिया आणि आफ्रिका खंडातील काही देशात स्वातंत्र्याचे लढे संघटीत झाले आणि त्यातल्या काही देशांनी स्वातंत्र्य मिळविले, युरोपीय देशांच्या वसाहत वादातून काहींनी सुटका करून घेतली. काही देशांची सुटका तशी झाली नाही परंतु तिथे लोकशाही स्वातंत्र्याचे वारे वहायला तरी लागले. अशा विसाव्या शतकाच्या पाचव्या आणि सहाव्या दशकामध्ये स्वतंत्र झालेल्या देशातील स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे पुढे काय झाले याचा इतिहास सर्वांना माहीत आहे. पाकिस्तानात लोकशाही संपली, बांगलादेशात तिचे धिंडवडे निघाले, ब्रम्हदेशात तर सलग चाळीस वर्षात लष्करी सत्ता राहिली आणि अनेक देशांतले स्वातंत्र्य संपुष्टात येऊन तिथे हुकूमशहांच्या राजवटी आल्या.

भारतात मात्र १९७५ ते ७७ या कालावधीतील आणीबाणी वगळता लोकशाही टिकून राहिली आहे आणि या देशांतल्या लोकांना शांततापूर्ण मार्गाने आपले हित करून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हे सगळे देश वसाहत वादाच्या कचाट्यातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी प्रगतीची वाट चोखाळावी अशी अपेक्षा होती परंतु काही अपवाद वगळता भारताशिवाय कोठेही स्वातंत्र्याचा हा हेतू साध्य झालेला नाही. भारतामध्ये हे साध्य होण्यामागे भारतीयांच्या परंपरा, विशिष्ट मनोप्रवृत्ती आणि या देशाला लाभलेले नेतृत्व या गोष्टी आहेत हे तर कोणी नाकारू शकणार नाही. परंतु या स्थैर्यामागे आणि प्रगतीमागे भारताची घटनासुध्दा उभी आहे आणि ती तयार करण्याचे श्रेय बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जात असल्याने आपण बिनदिक्कतपणे असे म्हणू शकतो की भारताच्या स्थैर्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे.

परंतु ज्या भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे त्या भारतीयांना त्यांच्या निधनानंतर ५०-५५ वर्षांनी त्यांचे आपल्या देशाच्या राजकीय स्थैर्यामध्ये किती मौल्यवान योगदान आहे याचा साक्षात्कार व्हायला लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत आणि घटना तयार होताना तिच्या जडणघडणीत तसेच तिचा मसुदा तयार करण्यात त्यांनी सर्वाधिक कष्ट घेतलेले आहेत. शेवटी कोणताही समाज कसा चालावा हे कायद्यावरून ठरत असते आणि भारतीय घटनेने आधुनिक कायदे दिलेले आहेत. आता आपल्या देशाचे जे विकासगामी चित्र निर्माण झालेले आहे ते करण्याची तरतूद  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या घटनेत केली आहे. त्यामुळे हे शक्य झालेले आहे.

सुमारे एक हजार वर्षे लहान-मोठ्या लढाया आणि सततचा रक्तपात यामुळे सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये अस्थिरता माजलेल्या या देशाचे आताचे जे चित्र आहे ते त्या हजार वर्षांच्या इतिहासाच्या तुलनेत तपासून पाहिले तर असे लक्षात येते की, भारताची आता होत असलेली जडणघडण ही सावकाशीने झालेली पण एक क्रांती आहे. हजार वर्षाची अस्थिरता, राजेशाही, त्यानंतरची इंग्रजांची गुलामगिरी यानंतर स्वतंत्र झालेला हा देश नेमका कोणत्या राज्यपद्धतीने चालावा याचा निर्णय करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती.

या देशातल्या राजकीय परंपरा, लोकांची मनःस्थिती, सामाजिक स्थिती, इतिहास या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून या देशाला कोणत्या प्रकारची राज्यपद्धती योग्य ठरेल याचा निर्णय या नेत्यांनी  केला आणि त्याचे सारे कायदेशीर तपशील डॉ. आंबेडकरांनी आपली विद्वत्ता पणाला लावून घटनेमध्ये शब्दबद्ध केले. भारताच्या राजकीय स्थैर्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दोन देणग्या प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या आहेत. त्यातली पहिली देणगी आहे लोकशाहीतील विविध यंत्रणांचे अधिकार आणि त्यांचे परस्परांवरील नियंत्रण.

देशाचा कारभार तीन स्तंभांवर आधारलेला आहे. संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका. यातली संसद सर्वात श्रेष्ठ आहेच कारण ती जनतेने निवडून दिलेली आहे. मात्र न्यायपालिका आणि कार्यपालिका यांनासुध्दा  भारतीय घटनने तेवढेच महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत. या तिघांच्या अधिकाराचा कोठेही टकराव होऊ नये यासाठी या तीन यंत्रणांचे संबंध कसे असावेत याबाबत आपल्या घटनेत जे नियम केलेले आहेत. ते नियम फार विचारपूर्वक केलेले असल्यामुळेच आपली लोकशाही टिकलेली आहे.  त्यातल्या प्रत्येकाला आपले स्वायत्त अधिकार राबविण्याची मुभा दिली. परंतु त्यातला कोणताही घटक आपल्या स्वायत्त अधिकारामध्ये एकाधिकार गाजवू शकणार नाही, अशीही नियंत्रणे त्याच्यावर ठेवली. त्यामुळे ही लोकशाही स्थिर झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबरला झाले असल्यामुळे आज त्यांचा महापरीनिर्वाण दिन देशभर पाळला जात आहे. भारतीयांना अजोड अशी घटना दिल्याबद्दल आपण सर्वांनीच आज त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. या महामानवास लक्ष लक्ष प्रणाम.

Leave a Comment