अभियंत्यांचा दर्जा

engineer
कोणत्याही गोष्टीची संख्यात्मक वाढ झाली की तिचा गुणात्मक दर्जा घसरतोच. भारतातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची गत तशीच झालेली आहे. महाविद्यालये भरमसाठ वाढली आणि त्यामुळे तिथल्या शिक्षणाचा दर्जा घसरला. आज ही अभियांत्रिकी महाविद्यालये ओस पडायला लागली आहेत. खरे म्हणजे देशाला अजूनही भरपूर अभियंत्यांची गरज आहे. परंतु शिक्षणाचा दर्जा घसरल्यामुळे अभियंत्यांना नोकर्‍या मिळेनाशा झाल्या आणि त्यामुळे महाविद्यालये ओस पडत आहेत. भरमसाठ महाविद्यालये एकदम काढल्यामुळे दर्जा घसरला. त्याऐवजी टप्प्याटप्प्याने अभियांत्रिकी शिक्षणाची सोय वाढवली गेली असती तर दर्जाही टिकला असता आणि मुलांना नोकर्‍याही मिळाल्या असत्या. आज येऊ पाहणारी अवकळाही टळली असती. पण गेल्या २० वर्षात महाविद्यालयांचा एकदम पूर आला आणि आता तो पूर ओसरल्यानंतर नदीचे पात्र जसे कोरडे पडते तशी महाविद्यालये सुनी सुनी व्हायला लागली आहेत. हे एकंदरीत देशाचे नुकसान आहे आणि ते शिक्षणाचे नीट नियोजन न केल्यामुळे होत आहे.

एकेकाळी भारतातल्या मेकॉलेप्रणित शिक्षण व्यवस्थेवर टीका केली जात होती आणि ती कारकून तयार करणारी व्यवस्था असल्याचे म्हटले जात होते पण आपल्या देशातली शिक्षण व्यवस्था एवढी खालावली आहे की तिच्यातून चांगले कारकूनसुध्दा तयार होत नाहीत. गेल्या महिन्यामध्ये परदेशातल्या काही उद्योजकांनी भारतातल्या अभियंत्यांच्या शिक्षणाच्या दर्जाची पहाणी केली तेव्हा असे आढळून आले आहे की या देशातून शिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या अभियंत्यांपैकी ८० टक्के अभियंते हे नोकरी करण्यास अपात्र आहेत आणि ही धक्कादायक माहिती आता वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे. या देशात दरवर्षी दोन लाखांपेक्षाही अधिक अभियंते शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि त्यांच्या पालकांची त्यांना चांगली नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. मात्र त्यांना चांगली नोकरी मिळू शकत नाही. कारण ते नोकरी मिळण्यास अपात्र असतात. वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातम्यांमध्ये असे काहीही म्हटलेले असले तरी या गोष्टीचा फार तपशीलाने विचार करण्याची गरज आहे. एवढे अभियंते नोकरी अपात्र का ठरतात? अपात्र म्हणजे नेमके काय असते? ही अपात्रता शिक्षण व्यवस्थेने निर्माण केलेली आहे की घाऊक दराने निघणार्‍या दर्जाहीन शिक्षणसंस्थांमुळे निर्माण झाली आहे. याचा एकदा शोध घ्यावा लागणार आहे.

आमच्या मते परिस्थिती आपण समजतो तेवढी वाईट नाही या देशातले ८० टक्के अभियंते अपात्र आहेत. याचा अर्थ २० टक्के अभियंते नोकरीस पात्र आहेत असा होतो आणि हे २० टक्के पात्र ठरणारे अभियंते याच शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडलेले आहेत. यावरून एक गोष्ट तर नक्कीच म्हणता येऊ शकते की ज्याअर्थी या व्यवस्थेतून २० टक्के का होईना पण पात्र अभियंते तयार होतात त्याअर्थी या व्यवस्थेत मुळात काही दोष नाही. दोष आहे तो महाविद्यालयांचा आणि तिथे उपलब्ध असणार्‍या शैक्षणिक सोयींचा. गेल्या दहा वर्षात आपण एक गोष्ट प्रामुख्याने पाहिली असेल की गावोगाव अभियांत्रिकी महाविद्यालये भरमसाठ निघत आहेत. शिक्षण महर्षी म्हणवून घेणार्‍या लोकांनी धंद्यांचा एक भाग म्हणून ही महाविद्यालये काढली आहेत. आपल्या देशामध्ये औद्योगिक प्रगती होत आहे आणि त्यामुळे अभियंत्यांना भरपूर नोकर्‍या मिळणार आहेत आणि त्याच बरोबर त्यांना चांगले पगारही मिळणार आहेत हे लक्षात आल्यामुळे पालकांनाही आपल्या मुलांना आणि मुलींना डोळे झाकून अभियांत्रिकी महाविद्यालयात पाठवायला सुरूवात केली.

मुलांच्या शिक्षणावर भरमसाठी खर्च करण्याकडे त्यांचा ओढा आहे हे बघून शिक्षण महर्षींनी अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली. १९८५ सालपर्यंत महाराष्ट्रात खासगी महाविद्यालये नव्हती. प्रत्येक महसुली विभागाला एक या प्रमाणे महाराष्ट्रात पाच सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि केवळ दोन-तीन खासगी महाविद्यालये अशी पूर्ण महाराष्ट्रात दहापेक्षा कमी महाविद्यालये महाराष्ट्रात अभियंते घडवत होती. मात्र मुक्त अर्थव्यवस्थेचा अंदाज येताच केवळ दशकभराच्या काळात राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या ५०० वर जाऊन पोहोचली. थोडक्या काळात भरपूर अभियांत्रिकी महाविद्यालये निघण्याचा हा कदाचित जागतिक विक्रम असावा. अर्थात हा जागतिक विक्रम लोकांच्या अभियांत्रिकी शिक्षणाकडे असलेल्या ओढ्यामुळेच प्रस्थापित झाला होता. अशाप्रकारे लोंढ्याने महाविद्यालये निघतात तेव्हा महाविद्यालयातल्या शिक्षणाचा दर्जा जेमतेमच असणार हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही आणि त्याचेच परिणाम आता आपण भोगत आहोत.

ही भारंभार महाविद्यालये निघाली त्यातल्या कित्येक महाविद्यालयांना पुरेसे प्राध्यापकसुध्दा मिळाले नव्हते. तेव्हा कॉलेजमध्ये ५ विषय शिकवले जातात पण त्यातल्या चार विषयांना शिक्षकच नाहीत आणि मुले कशीबशी शिकत आहेत अशी परिस्थिती ठिकठिकाणी दिसत होती. अशा अवस्थेतच अर्धवट शिक्षण घेऊन जी मुले बी.ई. किंवा एम. ई. झाली तीच मुले नंतर विविध महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कामाला लागली. त्यांना प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी बी.एड.सारखी शिक्षण शास्त्रातली पदवी घेण्याचीसुध्दा अट नव्हती. म्हणजे प्राध्यापक अर्धवट मग मुले कशी शिकून चांगली होतील. याही अवस्थेमध्ये महाविद्यालये सुरू राहिली पाहिजेत म्हणून मुलांचे अभ्यास चांगले नसतानाही त्यांना पास केले गेले. या कटामध्ये महाविद्यालये, त्यांचे शिक्षक आणि विद्यापीठेही सहभागी झाली. त्यामुळे अर्धवट शिक्षण झालेली ही मुले इंजिनिअर होऊन बाहेर पडली. तीच आता नोकरी करण्यास अपात्र ठरत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांकडचा ओढा कमी होत आहे आणि गेली १५ वर्षे ओसंडून वाहणारी महाविद्यालये आता गळती लागल्याने बंद पडायला लागली आहेत. हा केवळ शिक्षणाचाच नव्हे तर पूर्ण नियोजनाचाच पराभव आहे.

Leave a Comment