सत्तर हजार ता-यांचे वय सांगण्यात जर्मनीतील संशोधकांना यश

galaxy
बर्लिन : संशोधकांनी आपली आकाशगंगा कशी विकसित होत गेली याचा विकास नकाशा तयार केला असून त्यात बालदीर्घिका ते सर्पिलाकार दीर्घिका ही वाटचाल अधोरेखित करण्यात आली आहे.

७० हजार ता-यांचे वय या विकास नकाशात सांगितले असून ते तारे आकाशगंगेच्या निम्म्या टप्प्यांपर्यंत पसरलेले आहेत व आपल्यापासून ५० हजार प्रकाशवर्षे दूर आहेत. आपल्या दीर्घिकेच्या केंद्राशी जुने तारे असून ते विश्व लहान व तरूण असताना निर्माण झालेले आहेत. फार पलीकडे आपल्याला तरूण तारेही दिसतात त्यामुळे आकाशगंगा टप्प्याने वाढत गेली असे जर्मनीतील मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोनॉमी या संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञ मेलिसा नेस यांनी म्हटले आहे.

ब-याच मोठ्या अंतरांचा धांडोळा घेणारा आकाशगंगेचा आपल्याला आराखडा हवा होता व तो तसा तयार करण्यात यश आले आहे. लाल मोठे प्रकाशमान तारे त्यांच्या अंतिम टप्प्यात असताना त्यांचे निरीक्षण करून हा नकाशा तयार केला आहे. आपल्या सूर्यापासूनही हे तारे लांब अंतरावर असून जवळपास ते आकाशगंगेच्या परिघावर आहेत. लाल मोठ्या ता-यांचे वस्तुमान कळले तर त्यांचे वय फ्यूजन क्लॉक म्हणजे संमिलन घड्याळाच्या मदतीने काढता येते. लाल मोठ्या ता-यांचे वस्तुमान कळणे फार अवघड असते पण आता नवीन तंत्राच्या मदतीने ते काढता येते असे सहसंशोधक मारी मार्टिग यांनी म्हटले आहे. स्लोन डिजिटल स्काय सव्र्हेच्या वर्णपंक्तीचा वापर करून तसेच द अपाची पॉइंट ऑब्झर्वेटरी गॅलक्सी इव्होल्यूशन एक्सपिरिंमेंट यांच्या मदतीने हा नकाशा तयार करण्यात आला आहे, अपोजीमध्ये आदर्श पाहणी तंत्र वापरले असून त्यात ३०० ता-यांच्या वर्णपंक्ती आहेत, असे स्टीव्ह मजेवस्की यांनी सांगितले ते अ‍ॅपोजी पाहणीतील प्रमुख संशोधक आहेत. अनेक ता-यांकडे एकदा पाहणे म्हणजे ७० हजार लाल ता-यांचे एका दुर्बिणीने निरीक्षण करणे गेल्या काही वर्षांत शक्य झाले आहे. ता-यांचे वय मात्र अ‍ॅपोजी वर्णपंक्तींच्या मदतीने काढता आलेले नाही, दीश्घकेत आपलीच आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे त्यात दीर्घिकेची जन्मकथा महतत्वाची आहे व शीत कृष्णद्रव्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. आकाशगंगेत अनेक तारे असे आहेत की, त्यांची वाढ आपण अचूकपणे दाखवू शकतो हा आकाशगंगेचा महाकाय नकाशा फार महत्त्वाचा आहे, असे नेस यांनी सांगितले.

Leave a Comment