मडिकेरी- निसर्गसुंदर आणि सुगंधी पर्यटनस्थळ

madikeri
कर्नाटकाच्या कुर्ग जिल्ह्यातील हिल स्टेशन मडिकेरी निसर्गसौंदर्याबरोबरच सुगंधासाठीही प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ४५०० मीटर उंचीवरच्या या स्थळाचे मुख्य आकर्षण आहे ते येथली पर्वतशिखरे, हिरवेगार जंगल, थंड हवा आणि कॉफीचे मळे. या ठिकाणी वेलदोडे, मिरी, मध व फुलांच्या सुगंधाचा एक मनोहर दरवळ अनुभवास येतो व त्यामुळेच त्याला सुगंधी पर्यटनस्थळ म्हटले जाते. मडिकेरी, मधुकेरी, मरकरा या नावांनीही हे स्थळ ओळखले जाते.

या गावापासून सात आठ किलोमीटरवर असलेला अब्बो धबधबा गाठण्यासाठी छोट्याशा अरूंद रस्त्यातून व कॉफीच्या मळ्यातून जाणारा मार्ग काटावा लागतो खरा पण तेथे पोहोचल्यावर ५० फूट उंचीचा हा मस्त धबधबा सारा शीण घालवून टाकतो. राजा सीट या ठिकाणाहून सूर्योदय व सूर्यास्ताची अपरंपार शोभा नजरेत साठविताना भोवतीचे पर्वत, हिरवाई, भातशेती नजरेचे पारणे फेडते. हा पॉईट दक्षिणेतील बेस्ट व्ह्यू पॉईंट म्हणून ओळखला जातो. कुर्गचा राजा येथून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहात असे. येथील भूभागात ३३ टक्के जंगल असून ८० किमीवरचे नागरहोळ वन्यप्राणी अभयारण्य, तसेच तालकवेरी, पुष्पगिरी, ब्रह्मगिरी ही तुलनेने छोटी अभयारण्ये आवर्जून भेट द्यावीत अशी आहेत.

ओंकारेश्वर मंदिर, भागमंडळ, तालकोटी हरंगी बाध, मल्कनाद महाल, मंडपट्टी हिल्स अशी अनेक ठिकाणे येथून पाहता येतात. ट्रेकर्सप्रेमी येथे ट्रेकिंगचा आनंदही लुटू शकतात. येथे जाण्यासाठी आक्टोबर ते एप्रिल हा चांगला मोसम आहे. मंगलोर एअरपोर्टपासून येथे जाता येते तसेच मैसूर रेल्वे स्थानकावरूनही जाता येते.

Leave a Comment